Thursday 27 December, 2007

कार्बोदके २ : प्रकार

कार्बोदके मुख्यत: दोन प्रकारची आहेत.

१) साधी कार्बोदके अथवा शर्करा:
Simple Carbohydrates:Sugars
या शर्करेमध्येही दोन गट आहेत.
अ) गट पहिला: एक अणू शर्करा: Monosaccharides
या गटामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज व गॅलॅक्टोज इत्यादी प्रकारच्या शर्करा येतात.
ग्लुकोज: ही तुमच्या रक्तातील महत्वाची साखर असून ती तुम्हाला त्वरीत उर्जा देते.
फ्रुक्टोज : ही साखर अतिशय गोड असून तॊ फळे व भाज्यांमध्ये असते.
मधामध्ये या दोन्ही शर्करा असतात.
ब) गट दुसरा: द्वीअणू शर्करा: Disaccharides
या गटात सुक्रोज, माल्टोज व लॅक्टोज इत्यादी शर्करा येतात.
सुक्रोज: ही ग्लुकोज व फ्रुक्टोज या दोन अणूंच्या संयोगाने बनते. सुक्रोज ही साखर अतिशय गोड असून ती ऊस व बीट यांपासून बनवितात. हीच सुक्रोज साखर घालूम तुम्ही रोज चहा/ कॉफी/ दूध पिता.

लॅक्टोज : ही आहे दुधातील नैसर्गिक साखर. ती ग्लुकोज व गॅलॅक्टोज या दोन अणूंच्या संयोगाने बनलेली असते.
माल्टोज : ही साखर ग्लुकोजच्या दोन अणूंच्या संयोगाने बनत असून गोड पदार्थांमध्ये स्वाद येण्यासाठी ती वापरली जाते.
साधी कार्बोदके अर्थात साखर ही पचनास अत्यंत सहज व त्वरीत उर्जा देणारी असते.
पण सावधान ! साखर ही पचनास कितीही सहज व त्वरीत शक्ती देणारी असली तरी त्यातून इतर पोषक तत्वे मिळत नाहीत. त्यामुळे थकवा आला की ऊठ सुठ ग्लुकोज पावडर खाणेही योग्य नाही. त्यामुळे साखर खायचीच ती प्रमाणात खा. साखरेचा अतिरेक टाळा.

२)संयुक्त कार्बोदके अथवा पिष्टमय तत्व:
Complex Carbohydrates:

संयुक्त कार्बोदके साधारणपणे तीन गटात मोडतात.
अ)पिष्टमय तत्व: Starch
ग्लुकोजचे शेकडो अणू एकमेकांच्या टोकाला जोडले जाऊन पिष्टमय तत्व किंवा स्टार्च बनते.
वनस्पतींनी बनविलेली साखर वनस्पतींची गरज पूर्ण करूनही उरते. ही उरलेली साखर पिष्टमय तत्वांमध्ये रुपांतरीत करून भविष्यासाठी त्याची साठवण केली जाते. म्हणजेच पिष्टमय तत्व हे वनस्पतींचे साठवणीचे अन्न आहे. तेच आपल्याला धान्ये, कडधान्ये, मका, बटाते, रताळी इत्यादी मधून मिळते. वेगवेगळ्या धान्यांची पीठे, पिठांपासून बनविलेले वेगेवेगळे पदार्थ जसे भाकरी, पोळी, पाव. पिझ्झाबेस, पास्ता, नुडल्स इत्यादी तसेच भात , बटाटे, कडधान्ये, वाटाणे इत्यादींमध्ये हे पिष्टमय तत्व भरपूर प्रमाणात असते.
पिष्टमय तत्वाचे पचनानंतर साखरेत रुपांतर होते. पण हे पचन हळूहळू होते. त्यामुळे पिष्टमय तत्वापासून मिळालेली ऊर्जा जास्त वेळ पुरते. शरीराला जास्तवेळ ताकद व जोम मिळतो.


ब) तंतूमय तत्व:
Unsoluble Fiber: Cellulose

ग्लुकोजचे अनेक अणू एकमेकांना जोडले जाऊन हे सेल्युलोज अर्थात तंतू बनतात. या सेल्यलोज तंतूपासूनच बनस्पतींच्या पेशींचे आवरण बनलेले असते. हे पेशींचे आवरण असल्यामुळे अर्थातच त नविरघळणारे ( unsoluble) असते.

तुमच्या आहारातील फळे, भाजीपाला, धान्ये इत्यादीमध्ये हे तंतू असतात.

इतर प्राण्यांच्या शरीरात या तंतूंचे पचन होत असले तरी मानवी पचनसंस्था हे तंतू पचन करू शकत नाही. त्यामुळे त्यापासून शरीराला काही पौष्टिक तत्व मिळू शकत नाही.
असे असले तरी शरीरात पचन न होण्याच्या त्यांच्या या गुणामुळेच ते शरीराला उपयोगी पडतात. तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यावर त्यातील उपयुक्त पोषक तत्वे शरीर शोषून घेते . उरलेले काही पदार्थ हे टाकावू असतात. हे टाकावू पदार्थ शरीराबाहेर जावे लागतात. या सुट्या टाकावू पदार्थांना एकत्रित बांधण्याचे काम हे तंतू करतात. तंतूमुळे एकत्र बांधले जाऊन त्यांचा गोळा तयार होतो. गोळा बनल्याने हे टाकावू पदार्थ तुमच्या आतड्यातून पुढे सरकू लागतात. त्यामुले ते मळावाटे बाहेर टाकायला मदत होते. आहारात तंतूमय तत्व नसतील तर शरीरात निर्माण होणारे टाकावू पदार्थ मळावाटे शरीराबाहेर टाकायला अडचणी निर्माण होतात. बध्दकोष्ट होते. परिणामी आतड्यांचे बरेच आजार होऊ शकतात.
म्हणूनच .या तंतूमय तत्वांची तुमच्या शरीराला अत्यंत गरज आहेच त्यामुळे रोजच्या आहारात हे न पचनारे तंतू तुम्ही खाल्लेच पाहिजेत.

Tuesday 25 December, 2007

कार्बोदके १ : स्रोत

शरीराची वाढ व आरोग्य या साठी आवश्यक असणा-या पोषकतत्वांपैकी प्रथिनांनंतर दुसरे महत्वाचे पोषकतत्व आहे कार्बोदक.
अवयवांच्या बांधनीला जशी प्रथिने लागतात तसेच त्यांचे काम चालावे म्हणून ऊर्जा लागते. ही ऊर्जा पुरविण्याचे महत्वाचे काम कार्बोदके करतात.
कार्बोदकांपासून शरीराला मुख्यत: साखर, पिष्टमय तत्व तसेच तंतूमय तत्व मिळतात. ही तिन्ही तत्वे एकमेकांपासून वेगळी असली तरी त्या प्रत्येकाची शरीराला गरज आहे. प्रौढ पुरूषाच्या वजनाच्या दीड टक्का एवढ्या वजनाची कार्बोदके शरीरात असतात.



कार्बोदक म्हणजे काय?
कार्बोदक ( Carbohydrate) या शब्दातच त्याची व्याख्या दडलेली आहे. कार्ब म्हणजे कार्बन( Co2) + उदक म्हणजे पाणी ( Hydrate H2O) . या दोन्हींच्या संयोगाने बनते ते कार्बोदक.
बाजूच्या चित्रात कार्बोदकाचा अणू कसा बनतो हे बाजूच्या चित्रात दाखविले आहे.




कार्बोदकांचा स्रोत:
आहारातील कार्बोदकांचा मुख्य स्त्रोत आहे वनस्पती जन्य अन्न. तुम्ही शाकाहारी असाल तर प्रत्यक्षपणे किंवा मांसाहारी असाल तर अप्रत्यक्षपणे पण तुमच्या आहारातील कार्बोदके येतात ती वनस्पतींकडूनच.

वनस्पती सजीव आहेत. त्यांच्या वाढीसाठीही अन्नच लागते. मात्र तुमच्या आमच्यासारखे या अन्नासाठी दुस-यावर अवलंबून न राहता वनस्पती स्वत:चे अन्न त्यांच्यात असलेले हरित द्रव्य व सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने फोटोसिन्थेसिस ( photosynthesis) या क्रियेने स्वत: च बनवितात.
वनस्पती स्वत:चे अन्न कसे वनवितात हे "अन्न: स्रोत व वर्गीकरण या प्रकरणात ”(जुलै २००७ ) सविस्तर आलेच आहे. खालील चित्रात ते सारांशाने दाखविले आहे.

सूर्यप्रकाशातील ऊर्जेचा उपयोग करून मुळांकडून आलेले पाणी ( उदक / H2O / Hydrate) व हवेतून मिळविलेले कार्ब ( कार्बन डाय ऑक्साईड वायु /Co2 ) यांच्या संयोगाने वनस्पती शर्करा ( साखर) बनवितात. ही शर्कराच वनस्पतींचे अन्न आहे.

वनस्पतींची गरज पूर्ण झाल्यावर उरलेली साखर पिष्टमय तत्वाच्या रुपात वनस्पतींमध्ये पानांमध्ये तसेच इतरत्र साठविली जाते. या पिष्टमय तत्वामध्ये कार्बन, हायड्रोजन व प्राणवायु असतो. हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाणी/ उदक (H2O) बनते हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्याबरोबर कार्बनचा संयोग झाला की बनते कार्ब+उदक = कार्बोदक.

जेव्हा तुम्ही वनस्पतीजन्य शाकाहारी अन्न खाता तेव्हा ही कार्बोदके तुमच्या शरीराला मिळतात. हीच कार्बोदके इतर प्राण्यांच्या शरीरालाही मिळतात. मांसाहारी व्य्क्ती जेव्हा यातीलच एखाद्या प्राण्यांचे मांस खातात तेव्हा तीच कार्बोदके शरीराला मिळतात. म्हणजेच तुम्ही कोणतेही अन्न घेतले तरी कार्बोदके मिळतात ती वनस्पतीकडूनच !

Please Sign My Guestbook