Wednesday, 30 January, 2008

कार्बोदके ४ : शरीरातील कार्ये

कार्बोदकांची शरीराला गरज काय?
शरीरातील सर्व अवयवांचे, स्नायुंचे, पेशींचे कार्य होण्यासाठी ऊर्जा लागते. शरीराला लागणा-या एकंदर ऊर्जेची अर्ध्यापेक्षा जास्त गरज कार्बोदकांमुळे भागविली जाते. काही अवयव तर फक्त कार्बोदकांपासून मिळणा-या ऊर्जेवरच अवलंवून असतात. उदाहरणार्थ मेंदूचे सर्व कार्य सर्वस्वी साखरेपासून मिळणा-या ऊर्जेवरच चालते.
शरीराची सर्व महत्वाची कार्ये होण्यासाठी ऊर्जेची गरज असते.
उदाहरणार्थ
(१) ऊर्जा : शरीरातील सर्व पेशी, स्नायु तसेच मेंदू व नसा यांना साखरेपासूनच ऊर्जा मिळते.
(२) निर्माण व झीज: पेशी तयार होण्यासाठी व त्यांची झीज भरून येण्यासाठी कार्बोदकांचा उपयोग होतो.
(३) ग्लायकोजन: शरीराची गरज भागवून उरलेली जास्तीची कार्बोदके यकृताकडे पाठविली जातात. तेथे ती ग्लायकोजन मध्ये रुपांतरीत होऊन पुढील काळासाठी साठविली जातात.
तुम्ही एखादे दिवशी आहार घेतला नाहीत, उपास केलात किंवा काही लोक उपोषणाला बसतात तेव्हा हेच ग्लायकोजन पुन्हा ग्लुकोजमध्ये रुपांतरित होऊन रक्तामध्ये येते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखले जाते व तुम्हाला शक्तीचा पुरवठा केला जातो. अशाप्रकारे शरीराने साठविलेले ग्लायकोज उपास काळात तुमच्या उपयोगी पडते. उपोषणकर्त्याचा शरीरात जितके जास्त ग्लायकोजन साठले असेल तेवढा जास्त वेळ काही त्रास न होता ते उपोषण करु शकतात.
तुमच्या स्नायुंना ग्लुकोजची अत्यंत गरज असते. तातडीच्या वेळी उपयोगी पडावे म्हणून थोडे ग्लाय्कोजन स्नायुंमध्येही साठविले जाते.
(४) तंतूमय कार्बोदके अथवा सेल्युलोज : इतर कार्बोद्कांपासून याचे कार्य वेगळे आहे. त्यात शरीरास पोषकतत्वे नसतात. किंबहूना शरीर या तंतूंचे पचनही करू शकत नाही. आणि म्हणूनच या तंतूंचा मुख्य़ उपयोग शौच बांधनी साठी होतो. आहारात भरपूर पालेभाज्या, सालीसकट खाता येण्यासारखी फळे असतील तर तुम्हाला शौचास नेहमी साफ होईल व पुढील आयुष्यात आतड्याचे आजार होणार नाहीत.


Tuesday, 15 January, 2008

कार्बोदके ३ : चयापचय

कार्बोदके ३ : चयापचय
Carbohydrates3: Metabolism

कार्बोदकांचे पचन व शोषण:
( Digestion & Absorption)


ग्लुकोज, फ्रुक्टोज व गॅलॅक्टोज या शर्करा एका अणू पासून बनलेल्या असतात त्यामुळे त्यांचे आणखी विघटन होण्याची गरज नसल्याने त्या आहे त्या स्वरुपातच रक्तात शोषल्या जातात व हे शोषण अतिशय त्वरीत होते.
मात्र पिष्टमय तत्वे ही संयुक्त म्हणजेच दोनापेक्षा जास्त अणूंची बनलेली असतात. त्यामुळे शोषणाआधी त्यांचे विघटण व्हावे लागते.
आहारातील संयुक्त कार्बोदकांचे प्रथम तोंडातील लाळेमुळे काही प्रमाणात पचन होते.
त्यानंतर पुढील पचन हे लहान आतड्याच्या सुरवातीच्या भागामध्ये होते. लहान आतड्याच्या ड्युओडेनम या भागात स्वादुपिंडाकडून येणा-या स्वादुपिंड रसात ’अमायलेज" नावाचे विद्राव ( Enzyme) असते. त्यामुळे संयुक्त कार्बोदकांचे प्रथम द्वीअणू शर्करा माल्टोज यामध्ये रुपांतर होते.
माल्टोज ही साखर ग्लुकोजच्या दोन अणूंनी बनलेली असते. परंतु द्वीअणू शर्कराही आहे तशा रक्तात शोषल्या जात नाहीत. पुन्हा त्यांचे एकाणू शर्करे मध्ये रुपांतर व्हावे लागते.
हे विघटनही लहान आतड्यातच होते. लहान आतड्याच्या आतील आवरण हे पेशींचे बनलेले असते. या पेशींच्या आवरणावर किंवा आत काही विद्रावके असतात. त्यात ’माल्टेज” हे विद्रावक असते. या ’माल्टेज’ विद्रावकामुळे माल्टोज या विघटीत द्वीअणू शर्करेपासून ग्लुकोजचे दोन अणू विघटीत होऊन वेगळे होतात. आता हे ग्लुकोजचे अणू रक्तात त्वरीत शोषले जातात.
रोज आपण चहा / कॉफी/दूधात घालून घेतलेली ’सुक्रोज’ ही साखरही द्वीअणू असते. त्याचेही लहान आतड्यात ग्लुकोज व फ्रुक्टोज या एकाणू शर्करांमध्ये विभाजन व्हावे लागते. यासाठी ’सुक्रेज’ हे विद्रावक लागते ते लहान आतड्याच्या आतील आवरणाच्या पेशींच्या आवरणांवर असते.
दुधातील नैसर्गिक शर्करा असते ’लॅक्टोज’. ही शर्कराही ग्लुकोज व गॅलॅक्टोज या द्वीअणूंपासून बनलेली असते. त्याचेही विभाजन व्हावे लागते. त्यासाठी लहान आतड्याच्या आवरणावर ’लॅक्टेज’ हे विद्रावक असते.
कार्बोदके संयुक्त असोत की द्वीअणू त्यांचे एकाअणू शर्करेमध्ये विभाजन झाले की या एकाणू शर्करा रक्तामध्ये त्वरीत शोषल्या जातात.

कार्बोदके : चयापचय ( Metabolism)
रक्तात शोषल्या गेलेल्या या शर्करा पचन संस्था व यकृत यांना जोडणा-या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामार्फत मग यकृताकडे पोहोचविल्या जातात. शरीराला त्वरीत ऊर्जा मिळण्यासाठी ग्लुकोज हीच शर्करा लागते. त्यामुळे फ्रुक्टोज व गॅलॅक्टोज या एकाणू शर्करांचेही ग्लुकोजमध्ये रुपांतर व्हावे लागते. ते रुपांतर यकृतामध्ये केले जाते. आता यकृतात असलेले हे सर्व ग्लुकोज यकृताकडून हृदयाकडे जाणा-या रक्तवाहिणी मार्फत हृदयाकडे पाठविले जाते व तेथून ते शरीरातील प्रत्येक अवयव, स्नायु, पेशी पर्यंत पोहोचविले जाते. हेच ग्लुकोज या अवयवांना, स्नायुंना, पेशींना त्यांचे कार्य करण्यासाठी ऊर्जा देतात.
सर्वात महत्वाचा अवयव आहे मेंदू. मेंदूचे सर्व कार्य या ग्लुकोजवरच चालते. हे सर्व कार्य होण्यासाठी रक्तात या ग्लुकोजची एक नियमित पातळी असावी लागते.


दूध न पचणे : (Lactose Intolerance) :
कधी कधी काही लोकांना दूध प्यायल्यानंतर पोट फुगते, पोटात गॅसेस होतात, कळा येतात व कधी कधी जुलाबही होतात. असे वारंवार झाले म्हणजे ही मंडळी दूध प्यायला घाबरतत किंवा दूध एकदम वर्ज्य करतात. दूध वर्ज्य केल्यावर पोटाचा हा त्रास होत नाही.
असे का होते?
दुधातील लॅक्टोज या नैसर्गिक साखरेच्या पचना साठी ’लॅक्टेज’ हे विद्रावक लागते व ते लहान आतड्याच्या आतील आवरणाच्या पेशींच्या आवरणावर ( Brush border) असते हे आपण पाहिलेच आहे. काही मंडळींमध्ये हे ’लॅक्टेज’ विद्रावक एक तर मुळातच नसते किंवा कमी असते. ’लॅक्टेज’ च्या कमतरतेचे प्रमाण हे आफ्रिकन अमेरिकन, बान्टूलोक व आशियाई या लोकांमध्ये जास्त ( ८० ते ९० टक्के ) असते.

’लॅक्टेज’ ची ही कमतरता अनुवांशिक किंवा परंपरागत असू शकते. याचबरोबर लहान आतड्यांच्या वेगवेगळ्या आजारांमुळे ही कमतरता होऊ शकते. लहान आतड्याच्या आतील आवरणाला दुखापत, सूज, बॅक्टेरिया/ व्हायरस किंवा इतर जंतूंचा संसर्ग झाला तर हे ’लॅक्टेज’ कमी प्रमाणात तयार होते.
ब-याच भारतीय लोकांमध्ये ’लॅक्टेज’ या विद्रावकाची मुळातच कमी असते. काही जणांमध्ये लहान वयामध्ये ’लॅक्टेज’ योग्य प्रमाणात निर्माण झाले तरी साधारण मुले वयात येण्याच्या सुमारास ’लॅक्टेज’ निर्मितीचे प्रमाण कमी होत जाते.

’लॅक्टेज’ च्या कमतरतेमुळे लॅक्टोज या दुधातील नैसर्गिक साखरेचे पचन/विभाजन होत नाही. परिणामी ही लॅक्टोज साखर रक्तात शोषली न जाता आतड्यात तशीच राहते. आतड्यात साठलेली ही साखर मग रक्तातील पाणी आतड्यात ओढून घेते. आतड्यात नैसर्गिकरित्या असलेल्या सूक्ष्म जंतूंमुळे मग ही साठलेली साखर आंबविली जाते. या क्रियेमध्ये लॅक्टिक आम्ल ( Lactic Acid) व काही स्निग्धाम्ले तयार होतात. या सर्वांमुळे मग पचनक्रिया बिघडते व वर वर्णन केलेली लक्षणे चालू होतात.

अर्थात वरील लक्षणे ही सर्वसाधारण असून ती इतरही काही आजारांमध्ये दिसतात. अशावेळी प्रथम दूध वर्ज्य करून पहावे. दूध वर्ज्य केल्यावर जर खरोखरच फरक पडला तरच ही लक्षणे लॅक्टेजच्या कमतरतेची आहेत असे मानण्यास वाव आहे.

ज्यांच्यामध्ये खरोखरच लॅक्टेजची कमतरता आहे त्यांनी दुधाचे दही करून खावे म्हणजे लॅक्टोज साखरेच्या पचनाचा प्रश्न येत नाही. कारण मुळात दुधाचे दही बनते ते त्यात वाढणा-या लॅक्टोबॅसिलस( Lactobasillus) या सूक्ष्म जंतूंमुळे. हे लॅक्टोबॅसिलस ’लॅक्टेज’ निर्माण करतात. परिणामी दह्यामधून भरपूर प्रमाणात लॅक्टेज मिळते व दुधातील लॅक्टोज साखरेचे पचन व्यवस्थित होते. म्हणजेच दूध न पचण्याच्या त्रासातून मुक्तता व दुधातील सर्व पौष्टिक तत्वांचा शरीराला फायदा..


Please Sign My Guestbook