Tuesday 5 June, 2007

अन्नासाठी दाही दिशा

आदिमानवाचे अन्न :

पण जेव्हा घरी बनविलेले सकस अन्न पाटावर किंवा टेबलावर बसून खातो तेव्हा जरा कल्पना करा आपले पूर्वज जो आदिमानव तो काय खात असेल, कसे खात असेल, कुठे बसून खात असेल.


तुमच्या आमच्यासारखे तर नक्कीच नाही.
आदिमानव जेव्हा पृथ्वीवर निर्माण झाला तेव्हा तो जंगल, गुहा यासारख्या ठिकाणी रहात असे. त्याच्याकडे ना अन्न होते ना ते शिजवण्याचे काही साधन, ना अन्न साठविण्याचे काही साधन.
जंगलाच्या भटकंतीत त्याला जे काही मिळे उदा झाडांची मूळे, बीजे जंगली फळे पाने खाऊनच तो आपली भूक भागवत असे. जोडीला कधीतरी जंगलात मेलेल्या जनावराचे मांस ही असेल.


गरज ही शोधाची जननी आहे. आदिमानवाने अन्नाच्या गरजेतून प्राण्यांची शिकार करण्यासाठी दगडांपासून हत्यारे बनविण्याची सुरवात केली.
त्याचा बहुतेक सर्व वेळ अन्नाच्या शोधात जात असे. अन्नाचा साठा करू शकत नसल्याने एका प्रदेशातील अन्नाचा साठा संपला की तो पुढील प्रदेशात स्थलांतर करीत असे.
म्हणजेच त्याला अन्नासाठी दाही दिशाफिरावे लागत होते.
अन्न शिजविण्याचे काही साधन नसल्याने किंबहूना अन्न शिजविण्याची कल्पनाच नसल्याने तो निसर्गातून जसे मिळेल त्याच स्वरुपात तो आपले अन्न खात अस. कधीतरी जंगलात लागलेल्या आगीत होरपळल्या गेलेल्या वा भाजल्या गेलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असेलही. नाहीतर त्यावेळचे मानवाचे अन्न हे निसर्गातून जे मिळेल ते त्याच स्वरुपात म्हणजे कच्चेच असायचे.


पुढे जेव्हा त्याला आग कशी पेटवायची याचा शोध लागला तेव्हापासून कदाचित तो आपले अन्न भाजुन खाऊ लागला असेलही. त्यानंतरही अन्नाच्या गरजेतूनच मानवाची प्रगती चालूच राहीली. पुढे त्याने अन्न शिजविण्यासाठी भांडीही बनविली. या वेळेपर्यंत अजून आदिमानव गुहेतच राहून जंगलात आपसूकच जे मिळे त्यावर आपली भूक भागवित असे.



शेतीचा उदय:
साधारण इसवी सनपूर्व आठ ह्जार सालाच्या सुमारास मानवाने शेती करायला सुरवात केली. सुरवातीला निसर्गातून जी बिजे मिळत त्याचा वापर करून तो शेती पिकवू लागला. साधारण त्याच सुमारास अन्नासाठी प्राण्यांचा सांभाळ पैदास करावयास सुरवात केली. दूध मांस यासाठी त्याने शेळ्यामेंढ्या पाळण्यास सुरवात केली.
आता स्वत: शेती करायला लागल्यामुळे मानवाचे अन्नासाठी दाही दिशा फिरणे बंद झाले. माणूस आता ख-या अर्थाने पृथ्वीवर स्थिरावला. प्रमूख व्यवसाय पोटासाठी अन्न पिकविणे असल्याने मग साहजिकच जिथे पाणी आहे तेथेच तो स्थिरावला.

प्राचीन संस्कृतींचा उदय:
इ.स.पूर्व ३५०० ते १५०० या काळात जगातील काही मोठ्या नद्यांच्या काठी मोठमोठ्या संस्कृती उदयास आल्या. इजिप्त मध्ये नाईल नदीकाठी, इराकमध्ये टैग्रिस-युफ्रेटिस नद्यांकाठी, भारतवर्षमध्ये सिंधू नदीकाठी तसेच चीनमध्ये ह्युहॅग नदीकाठी या संस्कृती उदयास आल्या.
या सस्कृती उदयास येण्यामागे सुध्दा मानवाची अन्नाची गरज हेच कारण होते. या सर्व नद्यांचे काठ खो-यांमधली जमीन सुपीक होती. वातावरणही शेतीला पोषक होते त्यामुळे शेतीउत्पन्नही भरपूर मिळे.
नाईल नदीकाठचे शेतकरी त्याच शेतातून वर्षाकाठी दोन किंवा तीन पिके घेऊ शकत असत. गहू, बार्ली, भाजीपाला, द्विदल धान्ये, द्राक्षे, टरबूज इत्यादी फळांचे ते उत्पादन करीत. त्याच्या जोडीला ते पशुधन जसे गाय, बैल, बकरी, मेंढी इ. सुध्दा पाळीत ज्यांचा उपयोग ते शेतकाम, दुधदुभते मांस यांसाठी करीत.

प्राचीन ग्रीस नंतर रोम या देशांमध्ये लोकसंख्या वाढली . तेथे होणारे अन्नाचे उत्पादन कमी पडू लागले. अशावेळी इतर देशांकडून धान्य घेणे त्यांना गरजेचे झाले. त्याकाळी ग्रीक रोमन लोक आताच्या इराण असलेल्या पर्शिया या देशातून चेरी आणीत. आशिया खंडातून अप्रिकॉट, पीच मसाल्याचे पदार्थ येत तर इजिप्तकडून गहू येई.
अन्नासाठीच या साम्राज्यांनी इतरांच्या सुपीक भूमीवर आक्रमण करून तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. इ.स. पूर्व २०० च्या आसपास रोमन साम्राज्य युरोप, मध्यपूर्व आफ्रिका खंडाच्या उत्तरेस पसरले होते. या साम्राज्यात गव्हाची मोठी शेती होत असल्याने रोमन लोकांच्या आहारात गव्हाला खूपच महत्व होते.

इ.स.४०० च्या सुमारास रोमन साम्राज्याचा अंत झाला. त्यामुळे देशोदेशीमध्ये जो अन्नपदार्थांचा व्यापार देवाण घेवाण होई त्यामध्ये खूपच घट झाली नंतर ती बंद पडली.

जमीनदारशाही :
युरोपमध्ये श्रीमंत लोकांकडे खूप मोठ्या शेतजमीनीची मालकी असे. त्यामध्ये काम करायला शेती पिकवायला कामकरी वर्ग असे. या शेतीतून मिळणारे अन्न जमिनदार त्याच्या अधिपत्याखाली कष्ट करणारांसाठी पुरेसे असे. शेती मध्ये सर्व प्रकारचे धान्य, भाजीपाला, फळे पिकविली जात. तसेच अंड्यांसाठी कोंबड्या/ बदकांची पैदास केली जाई. मांसासाठी शेळ्यामेंढ्यांची पैदास केली जाई. तसेच शेतीस उपयुक्त म्हणून बैल, गाय इत्यादी जनावरे पाळली जात त्यांची पैदासही केली जाई. सर्वांना पुरेसे दुधदुभते, अंडी, मास मिळत सर्वांची गरज पूर्ण होत असे. यातून जमीनदारशाही संस्कृतीचा उदय झाला.

वसाहतवादाचा उदय:
इ.स.१०० ते १३०० च्या सुमारास युरोपमधील लोक मध्यपूर्वेमध्ये लढायांसाठी जात. तेथील खाद्यपदार्थ खावे लागल्यावर ते आवडू लागले. मायभूमीला परतल्यावर त्यांना तो खाद्यपदार्थ खायची इच्छा होई. यातूनच पुढे आंतरराष्ट्रीय व्यापार देवाणघेवाण पुन्हा सुरु झाली. नंतर मग इतर प्रदेशातील साधनसंपत्तीचा शोध घेण्यासाठी मोठमोठ्या मोहिमा काढणे तेथे जाऊन वसाहती करणे या प्रवृत्तीचा उदय झाला.


नैसर्गिक साधनसंपत्तीने भरपूर असलेला भारत देश सर्व युरोपिय लोकांचे लक्ष्य होता. इ.स.१४९२ मध्ये इटालियन नाविक ख्रिस्तोफर कोलंबस यानेही भारतवर्षाला जाण्याची मोहीम काढली. पृथ्वी गोल आहे हे यावेळेपर्यंत लोकांना पटलेच होते म्हणून मग आपण पश्चिमेला गेलो तरी भारतात पोहोचू या हिशेबाने कोलंबसाने पश्चिमेस प्रयाण केले.
कोलंबसाला जी भूमी दिसली त्यावर त्याने भारत समजून पाय ठेवला. ज्या भूमीवर पाय ठेवला ती भूमी युरोपिय लोकांना अज्ञातच होती. पण ती भारतवर्षाची नव्हे तर ती आतापर्यंत अज्ञात असलेली अमेरिका खंडाची भूमी होती.

नवीन अन्नपदार्थांचा शोध :
अमेरिकेचा शोध हा युरोपियन लोकांसाठी नवीन अन्नपदार्थांचा शोध होता. तेथील मूळ लोक ज्यांना, अमेरिकन इंडियन किंवा रेड इंडियन हे नाव दिले गेले ते खूप मका पिकवित. अमेरिकेच्या शोधानंतर युरोपिय लोकांना चॉकलेट, शेंगदाणे, मिरी, अननस, रताळी, भोपळे टोमॅटो इत्यादींची ओळख झाली.
अमेरिकेमध्ये ज्या युरोपिय वसाहती झाल्या त्या वसाहतीतील लोकांना तेथील रेड इंडियन लोकांचे अन्नपदार्थ खूपच आवडले. मक्याची शेती कशी करावी हे ते शिकले. त्यातूनच पुढे वसाहती साम्राज्यामध्ये मका हेच प्रमूख धान्य बनले.





Please Sign My Guestbook