Monday 10 March, 2008

स्निग्धघटक १ : रचना

आहारातील स्निग्धघटक : Dietary Fat

आहारातील तेल, तूप, चरबी हे सर्व स्निग्धघटक आहेत. स्निग्धघटक, चरबी, तेले अथवा फॅट हे सर्व रासायनिक पदार्थांचे गट आहेत. कार्ब ( कार्बन) , हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने हे स्निग्धघटक अथवा चरबी बनते.

आपल्या रोजच्या आहारातील हा एक महत्वाचा घटक असून शरीराला याची विविधप्रकारे गरज भासते. सर्वप्रथम या स्निग्धघटकांपासून भरपूर ऊर्जा मिळते. १ ग्रॅम प्रथिने किंवा कार्बोदकांपासून मिळणा-या ऊर्जेच्या दुप्पटीने १ग्रॅम स्निग्धघटक ऊर्जा देतात.

स्निग्धतेमुळे आपले अन्न खाण्यालायक चवदार होते. पोळीवर अथवा वरणभातावर तूप घातले तर एक वेगळीच चव येते. तेल हे आपले अन्न शिजविण्यासाठी लागणारे माध्यम पण आहे. तेलाची फोडणी नसेल तसे कोणतीही भाजी शिजवायची कशी? भजी /वडे / सामोसे तळायचे कसे?

आहारातील तेलांमुळे आपले पोट लवकर रिकामे होत नाही व खाल्लेल्या अन्नाच्या उदरातील पचनासाठी वेळ मिळतो.

रीराला आवश्यक अशी काही जीवनसत्वे फक्त चरबी / तेलामध्येच विरघळतात त्यामुळे ती रक्तात शोषली जाऊन शरीराला मिळतात.

काही स्निग्धाम्ले ( Fatty Acid) शरीराच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. पण शरीर त्यांची निर्मिती करू शकत नाही. अशा स्निग्धाम्लांना ’अति आवश्यक स्निग्धाम्ले’ ( Essential Fatty Acids) म्हणतात. वनस्पतीजन्य स्निग्धघटकांपासून अशी “अतिआवश्यक स्निग्धाम्ले”मिळतात. ही शरीराच्या वाढीसाठी , पेशींच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. शरीरात ही अति आवश्यक स्निग्धाम्ले जीवनसत्वांचे कार्य करतात.

स्निग्धाघटकांची रचना :

फॅट किंवा स्निग्धघटके बनतात स्निग्धाम्ल ( Fatty Acid) व ग्लिसरॉल ( हे मद्यार्क आहे) या दोन मूलभूत घटकांपासून.
स्निग्धाम्ल: मेदाम्ल : Fatty
Acid :

कार्बन अणूंच्य़ा लांबच लांब साखळीला हायड्रोजनचे अणू जोडले जाऊन स्निग्धाम्ल बनते. तीन स्निग्धाम्लांच्या साखळीला ग्लिसरॉल किंवा ग्लिसरीनचा अणू जोडला जाऊन फॅट किंवा स्निग्धघटक बनतो.

ग्लिसरॉल :: ग्लिसरीन : Glycerol :

ग्लिसरॉल/ ग्लिसरीन हे शर्करा मद्यार्क आहे. हे वासविरहीत द्र्वरूप स्वरुपाचे असून कार्बनचे तीन

अणू व तीन हायड्रोक्सी( OH) घटक एकमेकांना जोडले गेल्यामुळे बनते.
बाजूच्या आकृतीत ग्लिसरॉलची रचना दर्शविली आहे.


ग्लिसरॉलच्या या सांगाड्याला तीन स्निग्धाम्लांच्या साखळ्या जोडल्या जाऊन स्निग्धघटक बनतात


Please Sign My Guestbook