Sunday, 30 March 2008

स्निग्धघटक ३ : पचन व शोषण



पचन :Digestion

आहारातून मिळणा-या स्निग्धघटकांचे शरीरात पचन, शोषण ज्या प्रकारे होते ते समजायला तसे खूपच क्लिष्ट व अवघड आहे.
आहारातून मिळणारे स्निग्धघटक हे जास्त करून नैसर्गिक स्निग्धघटक किंवा लांब साखळ्यांवाले ट्रायग्लिसराईड ( Long chain Triglycerides) असतात. या मध्ये संपृक्त तसेच असंपृक्त स्निग्धाम्ले असतात. त्याचप्रमाणे नैसर्गिक फॉस्फोलिपिड ( Phospholipids), कोलेस्टेरॉलसारखे स्टेरॉल व आणखी बरीच कमी जास्त महत्वाची स्निग्धघटके तसेच स्निग्धघटकांत विरघळणारी जीवनसत्वे असतात.

आहारातील हे लांब साखळ्यावाले ट्रायग्लिसराईड पाण्यात न विरघळणारे असतात. आहारानंतर अन्न जेव्हा उदरात प्रवेश करते तेव्हा ते घुसळले जाते. या क्रियेमुळे स्निग्धघटकांतील कणांचा आकार एकदम छोटा केला जातो.
पुढे हे छोटे कण लहान आतड्याच्या सुरवातीचा भाग ड्युओडेनम ( duodenum) मध्ये जातात. त्यानंतर
ड्युओडेनम ( Duodenum) मध्ये सिक्रेटिन ( Secretin) व कोलेसिस्टोकायनिन ( Cholecystokinin) हे स्राव स्रवतात.
हे स्राव यकृतात (Liver) तयार झालेले पित्त व स्वादुपिंडात ( Pancreas) तयार झालेले पाचक रस ड्युओडेनम मध्ये यायला मदत करतात.

यानंतर ट्रायग्लिसराईडचे पचन व शोषण होण्यासाठी दोन क्रिया व्हाव्या लागतात. या दोन क्रियांसाठी पित्तक्षार व स्वादुपिंडरसातील विद्रावके महत्वाची भूमिका बजावतात.


(१) इमल्सिफिकेशन ( Emulsification) :
ट्रायग्लिसराईचे छोटे कण तरंगत ठेवणा-या एकप्रकारच्या तेलकट द्रावाची निर्मिती करणे.


(२) हायड्रोलिसिस (Hydrolysis) : विकरद्वारे पचन:
विद्रावकांमार्फत ट्रायग्लिसराईडचे पचन होऊन एकाकी ग्लिसराईड ( monoglyceride) आणि स्निग्धाम्ले यात रुपांतर करणे व सुटे झालेले हे मोनोग्लिसराईड व स्निग्धाम्ले यांचे आतड्याच्या पेशींमार्फत रक्तामध्ये शोषण करणे.

आता या दोन क्रियांमध्ये यकृतात निर्माण झालेले पित्तक्षार व स्वादुपिंडरसातील लायपेज हे विद्रावक महत्वाची भूमिका बजावतात. ट्रायग्लिसराईडव्यतिरिक्तची इतर स्निग्धघटके व कोलेस्टेरॉल यांच्या विघटनासाठीही पित्तक्षार उपयोगी आहेत.


(१) इमल्सिफिकेशन: Emulsification :
या मध्ये पहिली महत्वाची भूमिका बजावतात यकृताकडून आलेल्या पित्तातील पित्तक्षार.
हे पित्तक्षार ( Bile salts) हे कोलेस्टेरॉलपासून यकृतात तयार होतात. या पित्तक्षारांचे पाण्यात विरघळणारे व पाण्यात न विरघळणारे असे दोन भाग असतात.

असे हे पित्तक्षार ट्रायग्लिसराईडच्या संपर्कात आले की क्षाराचा पाण्यात
विरघळणारा भाग स्निग्धघटकाला आपल्यात ओढून घेऊन दोन्हींचा मिळून एक नवीन मिश्र कण तयार करतो. पित्तक्षाराचा पाण्यात विरघळणारा दुसरा भाग या मिश्रकणाभोवती कवचासारखा पसरतो. त्यामुळे ट्रायग्लिसराईडच्या कणांभोवती पाण्यात विरघळणारे कवच निर्माण होते. याच प्रक्रियेमुळे आहारातील पाण्यात न विरघळणा-या ट्रायग्लिसराईडचे बारीक बारीक कण किंवा थेंब होऊन ते तरंगत राहतात.


(२) हायड्रोलिसिस (Hydrolysis) :
स्वादुपिंडाकडून आलेल्या स्वादुपिंड रसात लायपेज( Lipase), कोलिपज( cholepase)ही विद्रावके ( Enzymes) असतात.
स्वादुपिंड रसातील कोलिपेज हे विद्रावक प्रथिन असून ते लायपेजला मदत करते.
लायपेजला ट्रायग्लिसराईड व पित्तक्षार यांच्या मिश्रकणांजवळ स्थिर करण्याचे काम कोलिपेज करते तर पाण्यात विरघळणारे पित्तक्षार लायपेजला मिश्रकणांच्या मध्यभागी असलेल्या स्निग्धघटकांच्या कणांपर्यंत पोहोचायला वाट करून देतात. अशाप्रकारे लायपेज, कोलिपेज व पित्तक्षार यांचे मिळून एक त्रिकूट बनते. (लायपेज हे पाण्यात विरघळणारे विद्रावक असल्याने ते स्निग्धघटकांपर्यंत विनासायास पोहोचावे यासाठीच मिश्रकण बनविण्याची आधीची क्रिया व्हावी लागते. )

आता कोलिपेजच्या मदतीने लायपेज या मिश्रकणांतील ट्रायग्लिसराईडच्या विघटणाच्या कामाला लागते. हे विघटन मुख्यत: १ व ३ या जागी होऊन त्यामुळे ट्रायग्लिसराईडचे रुपांतर दोन स्निग्धाम्ले व एक मोनोग्लिसराईड यांच्यामध्ये होते.
आधीच्या क्रियेमुळे निर्माण झालेले मिश्रकण जितके छोटे तितके लायपेज जास्त ठिकाणी कार्यरत राहुन जास्त चांगल्याप्रकारे ट्रायग्लिसराईडचे विघटन होते.


शोषण ( Absorption)

विघटन झाल्यानंतर तयार झालेले मोनोग्लिसराईड व स्निग्धाम्ले
हे पित्तक्षारांबरोबरच राहून दुस-या
स्निग्धघटकांबरोबर मिळून एकप्रकारचे वेगळे कण( (micelles) बनवितात. हे कण साधारण ४-८ नॅनोमायक्रॉन एवढ्या आकराचे असतात. आता हे कण शोषण ( absorption)होण्यासाठी तयार आहेत.

आहारातील सर्व अन्नघटकांचे पचन झाल्यानंतर आतड्यात एक द्राव तयार होतो. विघटन झालेले स्निग्धघटकांचे हे कण ( micelles) त्या द्रावात तरंगत राहतात.
हा द्राव आतड्यात जसा मिसळत राहतो तसे हे कण लहान आतड्याच्या आतील आवरणाच्या पेशींचा आवरणावर आदळत राहतात व तेथून ते त्या पेशींमध्ये शोषले जातात. पित्तक्षार यासाठी मदत करतात.

पेशींमध्ये आलेली ही स्निग्धाम्ले ठराविक प्रथिनांबरोबर बांधली जातात. आता पुन्हा उलट्या क्रमाणे त्यांचे ट्रायग्लिसराईड मध्ये रुपांतर केले जाते. ही ट्रायग्लिसराईडस पुन्हा लायपोप्रथिने व फॉस्फोलिपिड बरोबर बांधली जाऊन त्यापासून चायलोमायक्रॉन ( chylomicron) व खूप कमी घनतेची लायपोप्रथिने बनतात. ही लायपोप्रथिने मग स्वेतरसार ( Lymph) स्रवली जातात. तेथून ती नंतर रक्तात नेऊन सोडली जातात.

मध्यम आकाराच्या ट्रायग्लिसराईड पासून मिळालेली स्निग्धाम्ले लायपोप्रथिनांशी संयोग न होता सरळ यकृताकडे जाणा-या रक्तात मिसळली जातात. यकृतात मग ती अल्ब्युमिन ( albumin) या प्रथिनाबरोबर बांधली जातात.

Please Sign My Guestbook