Tuesday 26 June, 2007

चौरस समतोल आहार
रोजचा आहार :

अन्न बनते कसे, अन्नाचे स्रोत व स्रोतानुसर अन्नप्रकारांचे वर्गीकरण हे तुम्ही या आधीच्या लेखात वाचलेच असेल. यातील वेगवेगळ्या अन्नाघटकांचा वापर करून कच्चे किंवा शिजविलेले जे अन्न तुम्ही दररोज खाता तोच तुमचा रोजचा आहार.
प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार रोजचा आहार घेत असतो. मग प्रत्येकाचा आवडीप्रमाणे यात वेगवेगळी धान्ये , डाळी, भाज्या, तेल, फळे इत्यादी वनस्पतीजन्य घटक आणि मांसाहारी असाल तर धान्ये भाज्या यांच्या जोडीला अंडी, मांस, चिकन इत्यादी प्राणीजन्य घटक एकत्रित असतील

प्रादेशिक उपलब्धतेनुसार मुख्यत्वे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका इत्यादी धान्येच आहाराचा मुख्य आधार असली तरी जेवणात ही धान्ये आहे त्या स्वरुपात किंवा फक्त या धान्यांपासून बनविलेले पदार्थच आपण खात नाही. मुठभर गहू, मुठभर तांदूळ तर सोडाच पण नुसतीच पोळी, चपाती, भाकरी, पुलकी, पराठा, नान, तंदूरी रोटी किंवा पिझ्झाबेस कोणी खात नाही.
नुसता भात, नुसती पोळी, नुसतीच भाजी हे खाणे बेचव होईल हेच निव्वळ कारण आहे का?
असे खाणे बेचव तर होईलच पण मुख्य कारण आहे आपल्या शरीराला रोजच्यारोज आवश्यक असलेली पोषक तत्वे एकाच प्रकारच्या अन्नघटकांतून मिळणार नाहीत म्हणून.
अर्थात आपण आहारातून जे खातो ते चवीचे तर हवेच पण या आहाराचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्व आहे. शरीरातील विविध कार्ये पुरी करण्यासाठी व शरीराचे आरोग्य राखण्य़ासाठी शरीराला जी विविध पोषक तत्वे हवी असतात ती या आहारातूनच मिळतात. नुसती रोजच्या रोज आवश्यक असणारी पोषक तत्वेच नाही तर एखाद्या पोषकतत्वाची कमतरताही तसेच काही परिस्थितीमध्ये वाढलेली शरीराची गरजही त्या आहारातून पुरी व्हावी लागते.

चौरस समतोल आहार:

आपल्या भारतीय आहारात मुख्य जेवणाचे ताट भाजीपोळी, भातवरण, चटणी, कोशिंबीर, लोणचे, पापड, दही, ताक, तूप, लोणी, लिंबाची फोड असेच का सजते?
हे सर्व आपण आहारात एकत्रितच घेतो कारण असा आहार चवदार तर आहेच पण मुख्य कारण आहे की, शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी जी विविध पोषकतत्वे शरीराला रोजच्यारोज लागतात ती सर्व एकाच अन्न घटकातून मिळत नाहीत तर ती वेगवेगळ्या अन्नघटकातून एकत्रित घेतल्याने मिळतात. आणि आपल्या पुर्वजांनी या सर्व बाबींचा विचार करूनच असा हा आरोग्यदायी चौरस आहार बनविला आहे.

शरीराची वाढ, विविध कार्ये, शरीराचे आरोग्य, कार्यक्षमता राखण्यासाठी जी विविध प्रकारची पोषकतत्वे लागतात ती आहेत प्रथिने, कार्बोदके, स्निग्धघटक ( तेले), विविध जीवनसत्वे आणि खनिजद्रव्ये.

यातील कोणत्याही एका पोषकतत्वामुळे तुमच्या शरीराची गरज पूर्ण होऊ शकत नाही. शरीराची वाढ होण्यासाठी, शरीरातील अवयवांचे कार्य यातील कोणत्याही एका पोषकतत्वामुळे तुमच्या शरीराची गरज पूर्ण होऊ शकत नाही.
शरीराची वाढ होण्यासाठी, शरीरातील अवयवांचे कार्य होण्यासाठी तसेच शरीर कार्यक्षम राहण्यासाठी यातील प्रत्येक पोषक तत्व महत्वाचे व गरजेचे आहे.

रोजच्या आहारात जे अन्नप्रकार असतात त्या सर्व अन्नप्रकारामधून कमीजास्त प्रमाणात सर्व पोषकतत्वे मिळतात. यातील काही अन्न प्रकारांमध्ये इतर पोषक तत्वांबरोबर कोणतेतरी एक पोषक तत्व जास्त प्रमाणात असते. उदाहरणार्थ डाळी, मांस, अंडी, मासे इत्यादीमधून जास्त प्रथिने मिळतात.
काही अन्नप्रकारामध्ये कार्बोदकांचे प्रमाण जास्त असते. उदाहरणार्थ वेगेवेगळी धान्ये, भात, बटाटा, रताळी व फळे इत्यादी.
शेंगदाणे, तीळ, जवस इत्यादी तेलबिया व तळलेले अन्नपदार्थ सामोसे, वडे, भजी इत्यादीपासून जास्त स्निग्धघटक मिळतात.
साखरेतून मिळतात फक्त कार्बोदके. तेल, तूप यापासून फक्त स्निग्धघटकच मिळतात. स्निग्धघटक हे फक्त उर्जाच पुरवित असले तरी त्यात विरघळणारी काही जीवनसत्वेही त्यापासून मिळतात.
जीवनसत्वांपासून शरीराला ऊर्जा मिळत नाही पण ती तुमच्या शरीरातील चयापचयाच्या क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. तसेच प्रथिने, कार्बोदके व स्निग्धघटक यांचा शरीराला व्यवस्थिय उपयोग होण्यासाठी सुध्दा हीच जीवनसत्वे मदत करतात.
कॅल्शियम, फॉस्फरस यासारखी खनिजे तुमच्या शरीराचा सांगाडा मजबूत ठेवण्याचे महत्वाचे काम करतात.
या प्रत्येक पोषकतत्वाचे शरीराला आवश्यक असणारे प्रमाण वेगवेगळे आहे. तसेच जे अन्न तुम्ही खाता त्यातल्या प्रत्येक अन्न प्रकारामध्येही या पोषकतत्वांचे प्रमाण वेगवेगळे आहे.
काही अपवाद वगळता ही पोषकतत्वे तुमच्या शरीरात साठून रहात नाहीत त्यामुळे ती रोजच्या रोज आहारातून घ्यावी लागतात. त्यामुळे ही सर्व पोषक तत्वे ज्या आहारातून तुम्हाला मिळू शकतील असाच आहार असायला हवा. तसेच आहारातून घेतलेल्या सर्व पोषकतत्वांचे प्रमाणही त्यांच्या आवश्यकतेनुसार समतोल असायला हवे.
चौरस समतोल आहाराची हीच कल्पना आहे.

या प्राथमिक पोषकतत्वांच्या समतोल प्रमाणांचा विचार करून भारतीय आहारात भाजीपोळी, भातवरण त्यावर तूप, दही, कोशिंबीर, चटणी, लोणचे,पापड, मीठ आणि लिंबाची फोड असे जेवणाचे ताट आपल्या पुर्वजांनी सजविले आहे.

तुमचा आहार तुम्हीच ठरवा :
प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या, वेगवेगळ्या आवश्यक पोषक तत्वांचे आवश्यक प्रमाण वेगवेगळे, वेगवेगळ्या प्रदेशात मिळणारे अन्नप्रकारही वेगवेगळे, वेगवेगळ्या अन्नप्रकारातील पोषक तत्वांचे प्रमाण वेगवेगळे आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या.
या सर्व वेगवेगळेपणातून तुमच्या शरीराला आवश्यक त्या सर्व पोषकतत्वांचा आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा करणारा आहार कोणता हे ठरविणे, तो घेणे ही खरोखरच खूप अवघड गोष्ट आहे असे कदाचित तुम्हास वाटेल.
पण यामध्ये फारसे काही अबघड नाही.
फक्त या सर्व पोषक तत्वांबद्दल माहीती करून घेतली, त्यांचा शरीराला काय उपयोग आहे, रोज कोणत्या पोषकतत्वाची किती गरज आहे व ते पोषकतत्व कोणत्या अन्नप्रकारातून मिळेल हे सर्व जाणून घेतले तर चौरस समतोल आहाराचे महत्व तुम्हास समजेल. एवढेच नाही तर असा समतोल आहार तुम्हाला कशातून मिळेल हे ही तुम्हास समजेल,
तुम्ही रोज जे पदार्थ खाता त्यात कोणती पोषकतत्वे आहेत, कोणत्या प्रमाणात आहेत हे तुम्हाला तपासून पाहता येईल. सध्या तुमच्या आहारात एखाद्या पोषकतत्वाची कमतरता किंवा अतिरेक तर नाही हे ही तुम्हास पडताळून पाहता येईल. आणि मग निरोगी, कार्यक्षम राहण्यासाठी आपण कोणता आहार घ्यावा, आहारात कायकाय असावे, किती प्रमाणात असावे हे सर्व तुम्हीच ठरवू शकाल!
तुमचा आहार तुम्हीच ठरवू शकाल!


आहार ठरविण्यासाठी :
अन्नासाठी दाही दिशा हिंडणा-या आदिमानवाच्या काळापासून आजपर्यंतचा अन्नाचा इतिहास, त्याची प्रगती, शेतीचा उदय, अन्नाचा भौगोलिक विचार, प्रादेशिक उपलब्धता, अन्नाचे आंतरराष्ट्रीयकरण, आहाराच्या पूर्वीच्या सवयी, आताच्या बदलत्या सवयी,अन्न बनते कसे, येते कुठून, अन्नाचे स्रोत, वेगवेगळे अन्नघटक व स्रोतानुसार अन्नघटकांचे वर्गीकरण, आहार म्हणजे काय, समतोल चौरस आहाराची गरज याबाबत माहीती तर तुम्ही वाचलीच आहे.
आता या प्राथमिक पोषकतत्वांबद्दल शास्त्रीय माहिती, त्या प्रत्येकाचा तुमच्या शरीराला काय उपयोग आहे, आहारात कोणत्या अन्नघटकाची कमतरता असेल तर काय आजार होऊ शकतात, एखाद्या अन्नघटकाचा अतिरेक झाला तर त्याचे तुमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात हे यापुढील लेखांमधून जाणून घ्या.

सुरुवात अर्थात प्रथिनांपासून ...



Please Sign My Guestbook