Sunday 5 August, 2007

प्रथिने ३
प्रथिनांची शरीरातील कार्ये:
  1. अवयव बांधनी/ दुरुस्ती : शरीरातील प्रत्येक अवयव मुख्यत्वे हाडे, अस्थि कूर्चा, स्नायु इत्यादींच्या वाढी साठी, आरोग्यासाठी व त्यांची झीज भरून येण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत.
  2. पेशींमधील चयापचयाची क्रिया : पेशींचे कार्य ज्या रासायनिक क्रियांमुळे ( Metabolism) होते त्या क्रियांमध्ये प्रथिने विद्रावकाचे काम करतात. ही विद्रावाके या रासायनिक क्रिया होण्यास उत्तेजना देतात. त्यामुले शरीरा्ची सर्व कार्ये सुरळीत होतात.
  3. पाचक विद्रावके : आहारातून घेतलेल्या प्रथिने, पिष्टमय घटक, स्निग्घघटक या सर्वांचे पचनसंस्थेमध्ये व्यवस्थित पचन/शोषण/ विघटण होण्यासाठी जी वेगवेगळी पाचक विद्रावके (Digestive Enzymes ) लागतात ती प्रथिनेच असतात. उदाहरणार्थ : प्रथिनांचे पचन होण्यासाठी उदरातील पाचकरसात असलेले पेप्सिन(pepsin), स्वादुपिंड रसातील ट्रिप्सिन(trypsin), कायमोट्रिप्सिन ( chymotrypsin), विघटण होण्यासाठी लागणारे पेप्टिडेज ( peptidase /oligopeptidase)
  4. रक्तातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम : प्लाझ्मा ( plasma) हा रक्तामधील द्रवरुप पदार्थ आहे. तो रक्तात तर सतत प्रवाहित असतोच पण बारीक रक्तवाहिन्या व रक्तवाहिन्यांभोवतीचा परिसर यामध्येही तो नेहमी आत बाहेर प्रवाहित असतो. हा प्रवाह प्लाझ्माच्या oncotic pressure वर अवलंबून असतो. यानुसार प्र्वाहानुसार रक्तातील व रक्तवाहिन्यांबाहेरील परिसर यामधील पाण्याचे प्रमाण सतत संतुलित प्रमाणात बदलत राहते. या प्लाझ्माचे हे osmotic pressure व त्याचा प्रवाह संतुलित ठेवण्याचे मुख्य काम रक्तातील अल्ब्युमिन ( albumin) नावाचे यकृतात निर्माण होणारे प्रथिन करते. रक्तात जवळजवळ ६०% प्रमाणात हे अल्ब्युमिन असते. यामुळे रक्तवाहिन्यांमधून प्रवाहित असलेल्या रक्तातील oncotic pressure योग्य प्रमाणात संतुलित ठेवले जाते. पर्यायाने रक्तातील व आजुबाजूच्या परिसरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते. हे प्रथिन यकृतात बनत असल्याने यकृताचे आजारात याचे निर्माण कमी झाल्याने रक्तातील प्रमाण कमी होऊन पायावर सूज येते व पोटात पाणी साठते. त्याचप्रमाणे काही आजारांमध्ये हे प्रथिन जास्त प्रमाणात शरीराबाहेर टाकले जाते त्यामुळेही शरीरावर सूज येते. उदाहरणार्थ मूत्रपिंडाचे काही विकार( यात सर्वांगावर सूज येते. ) , आतड्यांचे विकार, गरोदरपण, इत्यादी मध्ये हे प्रथिन जास्त प्रमाणात शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे रक्तातील याचे प्रमाण कमी होऊन सर्वांगावर सूज येते. तसेच कर्करोग तसेच कुपोषण यामध्ये मुळातच ्शरीरात प्रथिनांचे प्रमाण कमी असते.
  5. प्राणवायु वाहक : रक्तातील हिमोग्लोबिन (Haemoglobin) नावाचे प्रथिन पुप्पुसामध्ये आलेला प्राणवायु शोषून तो शरीरातील सर्व अवयव, सर्व पेशींपर्यंत पोहोचविण्याचे काम करते. पंडूरोग म्हणजेच अनिमिया यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. त्यामुले सर्व अवयवांना प्राणवायुचा पुरवठा कमी होतो त्यामुळे अशक्तपणा, दम लागणे अशी लक्षणे दिसतात.
  6. शरीरातील अंतरग्रंथींचे स्राव: शरीराच्या वाढी साठी आवश्यक growth hormone, थायरॉईड (Thyroid ) या आंतर्ग्रंथीमध्ये स्रवणारे थायरॉक्सीन ( thyroxine) , अड्रीनल (Adrinal) ग्रंथीमधील अड्रीनलीन ( adrinaline), पॅराथारॉईड( Parathyroid) मधील पराथॉर्मोन ( parathormaone), अंडकोश (Testes)पासून टेस्टेस्टेरॉन( Testosterone) व बीजकोश (Ovary) यापासून इस्ट्रोजेन ( estrogene)/ प्रोजेस्टेरॉन (progesterone) हे सर्व ग्रंथींमधून स्रवणारे अंतरस्राव ( हार्मोन Hormone ) प्रथिनेच आहेत. या सर्व स्रावांवरच शरीराची वाढ, कार्यक्षमता, प्रजनन इत्यादी महत्वाची कार्ये अवलंबून आहेत.
  7. रोगप्रतिकारक शक्ती: शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही शरीरात असणा-या प्रतिजैविकांच्या प्रमाणावर अवलंबून असते. ही प्रतिजैविके प्रथिनेच असतात.पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात इत्यादी रोगप्रतिबंधक लसी घेतल्यानंतर साधारण तीन ते सहा आठवड्यानंतर शरीरात त्या त्या प्रकारची प्रतिजैविके बनतात. ही प्रतिजैविके त्या त्या रोगजंतूपासून होणा-या संसर्गापासून संरक्षण देतात.पण कधी कधी जंतूसंसर्ग झाल्यावर त्वरीत काम करण्यासाठी तयार लसींची गरज पडते. यासाठी प्राण्यांच्या शरीरात या लसी टोचून तयार झालेली प्रतिजैविके मग इंजेक्शनच्या रुपात मनुष्याला दिली जातात. या लसींशिवाय शरीरात अनेक प्रकारची प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके मुख्यत: ग्लोबुलिन ( globulin) या प्रथिनांपासून बनलेली असतात. या प्रतिजैविकांमुळे शरीराला नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती ( immunity) मिळते.
  8. रक्त गोठण्याचे महत्वाचे कार्य: शरीरावर कोठे ही जखम झाली तर रक्त वाहू लागते पण काही मिनिटातच रक्त वाहण्याचे आपोआप थांबते. ही एक शरीराची स्वरंक्षणासाठी असलेली एक नैसर्गिक क्रिया आहे. जखमेच्या जागी रक्त गोठल्याने हे असे होते. रक्त गोठण्याची ही नैसर्गिक क्रिया होण्यासाठी वेगवेगळे घटक लागतात ते सर्व घटक ( coagulation factors) प्रथिनेच आहेत. यातील एक जरी घटक कमी असेल तर शरीराची रक्त गोठण्याची क्रिया व्यवस्थित न झाल्याने जखमेनंतर रक्त न गोठता वाहू लागते. उदाहरणार्थ : हिमोफेलिया सारखा आजार.
  9. आपत्कालीन काम: शरीराला ऊर्जा पुरविण्याचे मुख्य काम कार्बोदके व स्निग्धघटक करतात. जर काही कारणाने शरीराला कार्बोदके व स्निग्धघटक या पोषकघटकांचा पुरवठा कमी झाला ( उदा. उपोषण) तर अशा आपत्कालीन काळी शरीरातील प्रथिनांपासून हे घटक तयार केले जातात व त्यांची गरज पूर्ण केली जाते. पण मग प्रथिनांची महत्वाची जी कार्ये आहेत त्यासाठी प्रथिनांची कमतरता निर्माण होते. काही काळ असे चालले तर मात्र शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण होऊन इंद्रिये व स्नायु कमकुवत होतात. म्हणूनच आहारात कार्बोदके व स्निग्धघटक पुरेशा प्रमाणात असले पाहिजे म्हणजे प्रथिनांचा वापर फक्त त्यांच्या महत्वाचा कामांसाठीच केला जाईल.
  10. प्रथिनांचे नुतनीकरण : आहारातून मिळालेल्या प्रथिनांपासून शरीरातील प्रथिनांचे वेळोवेळी नुतनीकरण केले जाते. म्हणूनच आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिने असणे आवश्यक आहे. वाढत्या वयाप्रमाणे मुलांसाठी तसेच गर्भारपणात ही गरज अधीकच आहे. शरीर कार्बोदके व स्निग्धघटक यांचा साठा करू शकते पण तसा प्रथिनांचा साठा करु शकत नाही. आहारातून जर प्रथिने कमी पडली तर यकृत व स्नायु यामधील प्रथिने वापरून शरीराची गरज पूर्ण केली जाते. काही काळ असे चालले तर मात्र ही इंद्रिये व स्नायु कमकुवत होतात. म्हणूनच रोजच्या गरजेची प्रथिने रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात असणे अत्यंत आवश्यक आहे.

शरीरातील प्रथिने त्यांच्या कार्याप्रमाणे पुढील गटात विभागली गेली आहेत.
  1. प्रतिजीविके / प्रतिजैविके : Antibodies
  2. हार्मोन : इंद्रियक्रियाप्रवर्कक आंतरोस्तर्ग स्त्राव. ( Internlly Secreted Hormone)
  3. विद्रावके : (Enzymes)
  4. पाचक विद्रावके : ( Digestive Enzymes)
  5. विरजणे : विरजण्याच्या अथवा गोठण्य़ाच्या क्रियेत सहाय्यभूत होणारी विरजणे (Coagulates)
  6. प्राणवायुवाहक : हिमोग्लोबिन (Haemoglobin)
  7. क्तातील प्रथिने : अल्ब्युमिन (Albumin ), ग्लोबुलिन ( Globulin)



Please Sign My Guestbook