Showing posts with label coconut water. Show all posts
Showing posts with label coconut water. Show all posts

Sunday, 20 May 2007

आरोग्यदायी पेये

प्राचीन भारतीय लोकांनी उत्तम जीवन जगण्यासाठी उत्तम स्वास्थ्याचे महत्व सांगितले आहे. उत्तम स्वास्थ्यासाठी सकाळी उठल्यानंतर पाणी, जेवणानंतर ताक व झोपताना दूध पिणे आवश्यक आहे असेही सांगितले आहे. तसेच ही पेये घेतल्याने तर वैद्याची गरज राहणार नाही असेही सांगितले आहे.
तुमच्यापैकी काही जण चहाकॉफी पित असतील. काहीजण दूध तर काही जण फळांचे रस घेत असतील. तर आणखी काहीजणांना बाजारात मिळणा-या अनेक त-हेच्या शीतपेयांची आवड असेल.
जास्त करून उन्हाळ्यामध्ये सारखी तहान लागते. याला कारणही आहे. कारण उन्हाळ्यामध्ये घामावाटे तसेच लघवीवाटे जास्त प्रमाणात पाणी व क्षार शरीरातून निघून जात असतात. या पाण्याची व क्षारांची भरपाई व्हावी लागते म्हणूनच तहान लागते. त्यामुळे तहान लागली की पाणी किंवा काहीतरी थंड पेय पिणे आवश्यक ठरते नाहीतर थकवा येतो. चहा, कॉफी, दूध, ताक, लस्सी, तयार सरबते किंवा फळांचे रस हे तर नेहमीच घेतले जातात. याव्यतिरिक्त कधीतरी बाजारात गेल्यावर उसाचा रसही घेतला जातो. काहीजण बाजारात मिळणारी थंड पेये घेत असतील.
पण या पेयांमध्ये पाण्याबरोबरच इतर काय घटक आहेत हेही तुम्ही जाणून घेतलेच पाहिजेत. एवढेच नाही तर कोणती पेये शरीराला हितकारक आहेत व कोणत्या पेयांमुळे तुम्हाला काय अपाय होऊ शकतो हे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे.

सगळ्यात चांगली पेये आहेत, ताज्या फळांचे घरी काढलेले रस. आवडत असेल तर दूध, ताक व लस्सी. या सर्व पेयांमधून साधारण किती पाणी, किती उष्मांक व साखर मिळते. हे पाहणे देखिल महत्वाचे आहे.
प्रत्येक पेयापुढे दिलेले आकडे हे त्यातील पाणी, उष्मांक व साखर या क्रमाने दिले आहेत.

दिलेले प्रमाण १०० ग्रॅम पिण्यायोग्य पेयातील आहे.


  1. मोसंबी ८८.४ / ४० / ७.३

  2. संत्री ९७.७ / ०९ / १.९

  3. कलिंगड ९५.८ / १६ / ३.३

  4. सफरचंदाचा रस ८४.६ / ५९ / १३.७

  5. टोमॅटोचा रस ९३.१ / २० / ३.६

  6. नारळपाणी ९३.८ / २४ / ४.४

  7. उसाचा रस ९०.२ / ३९ / ९.१

  8. ताक ९७.५ / १५/ ०.५

  9. ऑरेंज क्वॅश - / ३० / ७.०

  10. क्रिम सोडा - / २४ / ६.४

  11. लेमोनेड - / २२ / ५.७

  12. कोला व तत्सम पेये - / ३४ / ८.८

  13. नळाचे पाणी १०० / ० / ०

  14. खनिजयुक्त पाणी १०० / ० / ०

एक ग्लास म्हणजे २०० मिलिलिटर मोसंबी रसातून तुम्हाला साधारण १५ ग्रॅम साखर व ८० कॅलरीज मिळू शकतात. तेवढ्याच संत्र्याच्या रसातून ३.८ ग्रॅम साखर व १८ कॅलरीज मिळू शकतात. यावरून तुम्ही ठरवू शकता की कोणता रस तुम्हाला योग्य आहे. तुमचे वजन थोडे जास्त असेल व तुमची तहान तर भागली पाहिजे पण कॅलरीज जास्त नकोत तर तुम्हाला संत्र्याचा रस उत्तम. तसेच इतर रसांपेक्षा संत्र्याच्या रसात साखरही कमीच असते त्यामुळे मधूमेही व्यक्तीही हा रस घेऊ शकतात.

मोसंबी, संत्री, सफरचंद, कलिंगड, टोमॅटो, गाजर, काकडी , गव्हांकूर तसेच पालक, कारली अशा भाज्या यांचा रस तुम्ही घरी करून घेऊ शकता. कलिंगडामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अनिमिया किंवा पंडुरोग असेल तर कलिंगड खाणे किंवा त्याचा रस पिणे उत्तम. कलिंगडाच्या खालोखाल सफरचंदामध्ये लोहाचे प्रमाण आहे. या फळांपैकी काहीही घरात नसेल तर लिंबू अवश्य असतेच. साखर व मीठ घालून लिंबाचे सरबत हे केव्हाही चांगलेच. साखर नको असेल तर मध घालूनही ते चांगलेच आहे. सकाळी अनशापोटी मध घालून लिंबू पाणी पिणे हे आयुर्वेदातही सांगितले आहे. त्याने वजन कमी होते. मधूमेही व्यक्तींसाठी साखरेऐवजी सॅकॅरीन चालेल.
बाहेर गेल्यावर उसाचा रस व शहाळी ही उत्तम पेये आहेत.
त्यातही
नुसती तहानच भागवायची असेल तर नारळपाणी उत्तम.
पण खूप दमला असाल व त्वरीत शक्ती देणारी साखर हवी असेल तर उसाचा रस उत्तम.
कोणत्याही ताज्या फळांच्या रसातून थोडी प्राथमिक पोषकतत्वे, जीवनसत्वे तसेच खनिजद्रव्ये मिळतात.
चहा कॉफीमध्ये दूध असते म्हणून त्यातून पोषकतत्वे मिळत असली तरी त्यात कॅफिन नावाचे उत्तेजक तत्व असते. ते शरीरास अपायकारक आहे.

कोणतेही पेय प्यायचे तर आधी स्वच्छता ही पाहायलाच हवी. म्हणूनच घरी बनविलेले फळांचे ताजे रस, दूध, ताक , लस्सी, लिंबू सरबत तसेच नारळपाणी हे केव्हाही चांगलेच.
उन्हाळ्यात
घरी बनविलेल्या कैरीच्या पन्ह्याची सर कुठल्याच पेयाला येणार नाही.

उन्हाळ्यासाठी आणखी एक पौष्टीक पेय आहे तुळशीच्या बियांची खीर. यामुळे तहान तर भागतेच पण त्यातील पोषकता व औषधी गुणधर्मांचा फायदाही मिळतो.
एक कप खिरीसाठी २-३ चमचे तुळशीचे बी ५-६ तास पाण्यात भिजत घालावे. बी फुगून चांगले मऊ होते. पाणी काढून १ कप दूध घालून मिश्रण चांगले ढवळावे. थोडी शिजवून किंवा तशीच खीर प्यावी. अशा खिरीतून साधारण १५० कॅलरीज मिळतात.

बाहेरच्या पेयांमध्ये उसाचा रस स्वच्छता पाहून प्यायला हरकत नाही. पण शक्यतो बर्फ न घालता पिणे उत्तम. बर्फ कोणत्या पाण्यापासून बनविलेले असते माहीत नाही. तसेच ते ब-याच वेळा कुठेही ठेवलेले असते. त्यामुळे ते स्वच्छ व रोगजंतूविरहीत असेलच याची खात्री नसते.

बाहेर पाणी प्यायचेच असेल तर बाटलीबंद मिनरल वॉटर घेणे चांगले!



Tuesday, 15 May 2007

जलसंजीवनी !

जल हे जीवन आहे म्हणूनच काही कारणाने शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण त्वरेने कमी होऊ लागले तर कधी कधी उपचाराआधीच माणूस दगावू शकतो.

हगवण हा असाच एक आजार आहे ज्यात शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण अति त्वरेने व अति प्रमाणात कमी होते. हगवणीची लक्षणे आहेत जुलाब होणे, शौचास पातळ होणे. हगवण ही जंतूसंसर्गामुळे होते. कधीकधी तर शौचावाटे रक्तही पडते. हगवण व जुलाब याबरोबर उलट्याही होऊ शकतात.

या सर्वांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर शरीरातून पोटॅशियम व सोडियम हे क्षार निघून जातात. त्यामुळे त्यांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे स्नायु शिथील होतात. थकवा येतो. उलट्या होत असल्याने माणूस काही खाऊही शकत नाही.
त्यामुळे प्रत्येक जुलाब व उलटीमुळे शरीरातील कमी होणारे पाण्याचे प्रमाण व क्षारांची भरपाई ताबडतोब होणे गरजेचे असते.
पण ते झाले नाही आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण सतत कमी होत गेले तर रक्तदाब कमी होतो. रक्तदाब सतत कमी राहिला तर शरीरातील अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होत नाही . मूत्रपिंडाचा रक्तपुरवठा कमी होतो व मूत्र बनण्याची क्रिया मंदावते. परिणामी शरीरात अपायकारक तत्वे साचून राहतात. परिणामी कमी रक्तदाब व निकामी मूत्रपिंड यामुळे रोगी दगावू शकतो.


जास्तकरून लहान मुलांमध्ये या हगवणीमुळे शरीरातील पाणी अतिप्रमाणात कमी होते व ते त्वरीत भरून काढले नाही तर डॉक्टरकडे जाण्याआधीच मूल दगावण्य़ाची शक्यता असते.
अशावेळी दवाखान्यात जाईपर्यंत जर घरीच काही प्रथमिक उपचार त्वरीत चालू केले तर निदान जीव वाचविला येतो.
जीव वाचविण्याच्या दृष्टीने घरीच सुरू करण्यासारखा काय उपाय आहे?

अशावेळी जीवन देते जलसंचीवनी!

जीवनदायी जलसंजीवनी !
जीवन देणारी ही जलसंजीवनी आहे पाणी व शरीरास आवश्यक असणा-या क्षारांचे प्रमाणित मिश्रण!
याने जुलाब व उलट्या यामुळे शरीरातील कमी होणारी पाण्याची व क्षारांची पातळी भरून निघण्यास मदत होते.
३.५ ग्रॅम खायचे मीठ ( सोडियम क्लोराईड) + २० ग्रॅम साखर ( ग्लुकोज) + २.५ खाण्याचा सोडा( सोडा बाय कार्ब) + १.५ ग्रॅम पालाश ( पोटॅशियम ) हे सर्व घनपदार्थ एकत्र करून बवविलेल्या मिश्रणाची तयार पाकिटे औषधाच्या दुकानात मिळतात.

एक पाकिट एक लिटर पाण्यात विरघळविल्यानंतर जे द्रावण बनते ती आहे जलसंजीवनी !

ही तयार झालेली जलसंजीवनी जुलाब व उलट्या होत असताना सतत पित / पाजत राहणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील कमी झालेल्या पाणी व क्षारांची भरपाई शरीरास होऊ शकते.



जलसंजीवनी घरी बनवा :
आयत्यावेळी जर जलसंजीवनीचे पाकिट घरी नसेल किंवा दुकानात मिळाले नाही तरी काही काळजी करण्याचे कारण नाही. ही जलसंजीवनी तुम्ही घरीही बनवू शकता.

एक लिटर पाण्यामध्ये साधारण आठ चमचे साखर व एक चमचा मीठ टाका व विरघळवा. ही झाली तुमची जलसंजीवनी तयार !
यामधून शरीराला त्वरीत पाणी , सोडियम व ऊर्जा मिळते.

याच्या जोडीला नारळाचे पाणी घेतले तर त्यातून पोटॅशियमची कमतरता भरून येते.

त्यामुळे हगवण / उलट्या होत असलेल्या व्यक्तीस ही जलसंजीवनी त्वरीत चालू करून दवाखान्यात जाईपर्यंत सतत पाजत रहावे.

जास्त प्रमाणात व जास्त दिवस हगवण होत असेल तर भूक मंदावते. अशावेळी जलसंजीवनी बरोबर फळांचे रस, ताक, डाळीचे पाणी व भाताची पेज इत्यादी घेणे आवश्यक आहे. त्यातून इतर पोषक घटक शरीराला मिळतात.

यापुढे जर घरी, आजूबाजूला कोणाला हगवण / उलटी होत असेल तर सर्वात प्रथम ही जलसंजीवनी घरच्या घरी तयार करून त्याचा वापर सुरू करा.
जलसंजीवनीमुळे जुलाब/ उलट्या थांबणार नाहीत हे लक्षात घ्या. पण हगवणी व उलट्यांमुळे होणारी शरीरातील पाणी व क्षार यांची कमतरता भरून येईल. तेव्हा जुलाब/ पातळ शौचास/ उलट्या होत असतील तर डॉक्टरकडे तर जाच पण त्याआधी ताबडतोब त्या व्यक्तीस जलसंजीवनी चालू करा !


Please Sign My Guestbook