Tuesday, 1 May, 2007

!! सुस्वागतम !!

"आहार आरोग्य " या ब्लॉगविषयी :

या ब्लॉगला भेट देणा-या सर्व मराठी बंधू भगिनींचे स्वागत!
हा ब्लॉग वाचणा-या सर्व मराठी बंधू भगिनींना माझी एक विनंती आहे की याविषयावरचे इथून पुढील लिखाण ज्या क्रमाणे इथे प्रसिधद करण्यात आलेले आहे त्याच क्रमाने ते वाचल्यास सुसंगत व उपयुक्त ठरेल !

तसेच इथे दिलेली सर्व माहिती ही समाजात ज्ञानप्रसार व्हावा या उद्देशाने दिली आहे . कोणीही आजारी व्यक्तीने स्वत:हून काही प्रयोग न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांचा आहार ठरवावा.
तसेच या ब्लॉगमधे आतापर्यंत प्रसिध्द केलेल्या व पुढे करण्यात येणा-या लिखाणाची पार्श्वभूमी मी थोडक्यात इथे सांगू इच्छिते. तीही आपण जरूर वाचावी

माझा मुलगा जेव्हा लहान होता, शाळकरी होता तेव्हा त्याला आहारातील प्रत्येक पोषक घटक, जीवनसत्वे, खनिजे व इतर पोषक तत्वे याविषयीची शास्त्रीय माहीती व त्या घटकांचे आरोग्यासाठी काय महत्व याबद्दल माहीती देऊन चांगल्या आहाराबद्दल त्याच्यात जागरूकता निर्माण करावी या उद्देशाने मी आहाराबद्दल लिहायला सुरवात केली.

मी स्वत: फिजिशियन असल्याने शास्त्रीय माहीती होतीच. त्याचप्रमाने इतरही वाचन केले. मग त्यात खूपच आवड निर्माण झाली. आपले अन्न व आहार, त्यातील मूलभूत घटकाची शास्त्रीय माहीती इत्यादीविषयी मग मी माझ्या शाळकरी मुलाला समजावे यासाठी सोप्या भाषेत लिहायला सुरवात केली. लिहिलेली माहीती खूप जास्त होती.

म्हणून मग ही सर्व माहिती व्यवस्थित लिहुन मुलांसाठी / मोठयांसाठी "शास्त्रीय माहितीसह आहाराविषयी मार्गदर्शन" असे पुस्तक प्रसिध्द करावे या उद्देशाने संगणकावर ’लोकसत्ता फॉन्टफ्रिडम ’ या मराठी softwareचा उपयोग करून स्वत: लिहून काढले. ही सर्व प्रक्रिया दोन तीन वर्षे चालली.

त्यानंतर मात्र माझे मणक्याचे दुखणे चालू झाले. माझ्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली त्यामुळे संगणकावर साठवून ठेवलेल्या फाईल्स तेथेच राहिल्या. त्यानंतर कार्यबाहुल्य व एकापाठोपाठ आलेल्या काही कौटुंबिक तशाच वैयक्तीक अडचणीं यामुळे हे सर्व लिखाण मी आजपर्यंत पुस्तकरुपाने प्रसिध्द करू शकले नाही.

ज्या मुलासाठी मी हे लिहिले त्यानेच या माहीतीचा उपयोग इतरांनाही व्हावा यादृष्टीने Internet वरील Blog च्या माध्यमातून हे लिखाण प्रसिध्द करण्याची कल्पना दिली. म्हणून मी आता माझे सर्व लिखाण "आहार व आरोग्य" या मराठी ब्लॉगवर प्रसिध्द करीत आहे.

मुळात मी हे लिखाण शाळकरी मुलांना नजरेसमोर ठेवून लिहिले आहे त्यामुळे ते अतिशय सोप्या भाषेत, सोपी उदाहरणे देऊन लिहिले आहे तसेच मुलांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने ते त्यांना संबोधीत करून लिहिले आहे. त्यामुळे ते अतिशय बाळबोध वाटण्याची शक्यता आहे.

शास्त्रीय माहीती सर्वांसाठी तर तीच राहते. ती छोटे की मोठे वाचणार याप्रमाणे बदलत नाही त्यामुळे मी हे लिखाण आहे तसेच प्रसिध्द करायचे ठरविले आहे. काहीवेळा लिखाण अतिशय सोपे बाळबोध वळणाचे वाटले तरी त्यामागची पार्श्वभूमी हा ब्लॉग वाचणारे माझे मराठी बंधू /भगिणी समजून घेतील अशी आशा करते.

या ब्लॉगला भेट देणा-या सर्व मराठी तरूण /बंधू /भगिणी या सर्वांना एक विनंती आहे की कृपया त्यांनी हा ब्लॉग वाचल्यानंतर आपल्या ब-यावाईट प्रतिक्रिया जरून comments मध्ये नोंदवाव्यात. म्हणजे पुढील लिखाणाला दिशा मिळेल.

धन्यवाद...

आधारसूची :  1. Nutritive Value of Indian Foods : by C. Gopalan, B.V. Rama Shastry & D.C.Balsubramanian published by National Institute of Nutrition at Hyderabad. या लिखाणात बरेच ठीकाणी अन्नपदार्थातील मूलभूत घटकांचे जे प्रमाण दिले आहे. ते बहुतांश वरीलपुस्तकावर आधारीत आहे.

  2. Clinical Dietetics and Nutrition : ( fourth edition) by F.P. Antia & Philip Abraham.

  3. Various Textbooks of Medicine.

  4. लिखाण समजण्यास सोपे व्हावे यासाठी ठिकठिकाणी वापरलेल्या आकृत्या व फोटो Internet वरुन घेतलेले आहेत.


Please Sign My Guestbook