Thursday 10 April, 2008

स्निग्धघटक ४ : कार्ये



रीराच्या वाढीसाठी तसेच पेशींच्या कार्यासाठी काही स्निग्धाम्ले अत्यंत आवश्यक आहेत. पण शरीर त्यांची निर्मिती करू शकत नसल्याने ती रोजच्या रोज आहारातून मिळावी लागतात. म्हणूनच अशा स्निग्धाम्लांना ’अति आवश्यक स्निग्धाम्ले’ ( Essential Fatty Acids EFA) म्हटले जाते. शरीरात ही अतिआवश्यक स्निग्धाम्ले जीवनसत्वांचे काम करतात.
वनस्पतीजन्य स्निग्धघटकांपासून अशी अतिआवश्यक स्निग्धाम्ले मिळतात.
स्निग्धघटकांची शरीरात साधारण तीन ते चार महत्वाची कार्ये आहेत.

ऊर्जा स्रोत:
प्रत्येक स्निग्धाम्लांची रचना वेगवेगळी असली तरी सर्वांमध्ये कार्बन व हायड्रोजनची बंधने भरपूर प्रमाणात असतात. याच कार्बन-हायड्रोजन बंधनांमुळे त्यांच्यात भरपूर ऊर्जा निर्माण कर्ण्याची शक्ती असते. ट्रायग्लिसराईड मुळे अगदी छोट्या जागेत भरपूर ऊर्जा साठविली जाते. स्निग्धाम्ले हे पाण्यात विरघळत नसल्यामुळे शरीरात त्यांची साठवण होण्यासाठी काही खास वेगळी पध्दत अवलंबली जाते.


पेशींचे आवरण :
शरीरातील पेशींचे बाह्य आवरण अतिआवश्यक स्निग्धाम्लांपासून बनलेले आहे. पेशींच्या
आतील गाभा जरी प्रथिनांपासून बनलेला असला तरी पेशींचे आवरण त्या गाभ्याचे संरक्षक कवच आहे. प्रत्येक पेशींचे कार्य वेगळे त्याप्रमाणे प्रत्येक पेशींचे आवरण वेगवेगळे असते. याकामी फॉस्फोलिपिडची महत्वाची भूमिका आहे. आवरण नसले तर पेशींना संरक्षण नाही म्हणूनच शरीरातील पेशींच्या तंदुरुस्तीसाठी स्निग्धघटके अत्यावश्यक आहेत.


डोळ्याच्या आतील रेटीना ( Retina) :

हे आवरण अतिआवश्यक स्निग्धाम्लांपासून बनलेले असते. डोळ्यात शिरलेल्या प्रकाशकिरणांची संवेदना डोळ्याच्या आतील या रेटीना पटलावर पडल्यानंतर ती मेंदूपर्यंत पोहोचविली जाते. म्हणूनच आपण हे जग पाहू शकतो. डोळ्यांच्या तंदुरुस्ती साठी म्हणूनच स्निग्धघटक अत्यावश्यक आहेत.
दोन मज्जातंतू जेथे जोडले जातात तेथेही एक पातळ आवरण असते तेही स्निग्धाम्लांपासून बनलेले असते. त्यामुळे एका मज्जातंतूपासूनची संवेदना दुस-या मज्जातंतूपर्यंत विनासायास पोहोचते. म्हणूनच मज्जासंस्थेच्या तंदुरुस्तीसाठी सुध्दा स्निग्धघटके आवश्यक आहेत.

जीवनसत्वे व हार्मोन: शरीरातील चयापचयाची क्रिया ( metabolism) व्यवस्थित होण्यासाठी काही जीवनसत्चे व हार्मोन लागतात. काही स्निग्धाम्ले हेही कार्य करतात. त्याचप्रमाणे अ,ड,ई व के ही जीवनसत्वे पाण्यात न विरघळणारी आहेत पण ती स्निग्धघटकांमध्ये विरघळतात. त्यामुळे आहारात योग्यप्रमाणात स्निग्धघटक असतील तर ही जीवनसत्वे मिळू शकतात.


कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित ठेवणे :
रक्तात कोलेस्टेरॉल नावाचा पांढरा मेणचट पदार्थ असतो. शास्त्रज्ञांच्या मते आहारातील असंपृक्त स्निग्धघटकांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी मर्यादीत राहण्यास मदत होते तर .
आहारातील संपृक्त स्निग्धघटकांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. मग तो हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिण्यांच्या आतील आतील आवरणावर जमा होतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती खडबडीत, कडक व अरुंद बनतात. अशा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी लवकर जमते. त्यामुले हृदयाचा रक्त पुरवठा कमी होऊन हृदयविकाराचा झटका येतो.

Please Sign My Guestbook