तुम्ही पाणी खातही असता !!
तुम्ही पाणी नुसते पितच नाही तर ते तुम्ही खातही असता!
वाचून आश्चर्य वाटले ना? पण कसे ते वाचा.तुम्ही पाणी नुसते पितच नाही तर ते तुम्ही खातही असता!

समजा तुमची पाण्याची रोजची गरज दोन लिटर एवढी आहे आणि एखादे दिवशी तुम्ही एकच लिटर पाणी प्याला तरीही तुम्हास पाण्याची कमतरता कदाचित जाणवणार नाही. कारण तुमची उरलेली गरज तुम्ही खाल्लेल्या अन्नातून भागविली जाते.
वनस्पती, प्राणी इत्यादी सर्व सजीवांमध्ये पाण्याचा भरपूर अंश असतो. तुम्ही शाकाहारी असाल तर याच वनस्पती व तुम्ही मांसाहारी असाल याच प्राण्यांपासून तुमचे अन्न येते. त्यामुळे तुमच्या आहारातील जवळजवळ सर्व अन्नपदार्थांमध्ये पाणी असतेच.
या तक्त्यावरूनच कल्पना येईल.

काकडी : ९९ %
कलिंगड : ९५ %
गाजर : ९० %
सर्व भाज्या व पालेभाज्या : ८० ते ९० %
फळांचे रस : ९० %
संत्री : ८७।६ %
मक्याचे दाणे : ६७ %

पनीर : ३७ %
धाने, कडधान्ये व डाळी : १० ते २० %
या पोषक अन्नघटकांचे ऊर्जेत अथवा शरीराच्या वाढीसाठी आणि झीज भरून काढण्यासाठी लागणा-या पोषक मूलतत्वांमध्ये रुपांतर होणे यासाठी ज्या रासायनिक क्रिया शरीरात घडतात त्या सर्व क्रिया द्रावण स्वरुपात होतात. यासाठी शरीराला पाण्याची अत्यंत गरज आहे. शरीरात निर्माण होणारे टाकावू पदार्थ बाहेर टाकण्यासाठी सुध्दा पाण्याची गरज आहे.
शरीराच्या कार्यासाठी म्हणूनच तुमच्या शरीरात पाण्याचे पुरेसे व योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे.
अन्नाशिवाय तुम्ही साधारण ६ ते ८ आठवडे जगू शकाल पण पाण्यावाचून एक आठवड्यापेक्षा जास्त जगू शकणार नाही. शरीरातील पाणी वीस टक्क्याहून जास्त कमी झाले तर तुमचे शरीर सुकत जाऊन अतिशय वेदना होऊन मृत्यू येतो.
म्हणूनच रोज निदान २ ते २.५ लिटर पाणी शरीरात गेलेच पाहिजे.