Wednesday, 30 April, 2008

स्निग्धघटक ६ : गरज

आहारातील रोजची गरज: Daily Fat Allowance

आहारातून किती स्निग्धघटक शरीरात गेले पाहिजेत किंवा शरीराला किती स्निग्धघटकांची गरज आहे याबद्दल नक्की काही प्रमाण निश्चित झालेले नाही. पण हे प्रमाण ठरविताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
(१)अत्यावश्यक स्निग्धाम्ले ही फक्त आहारातूनच मिळत असल्याने ती पुरेशी मिळण्याइतपत स्निग्धघटक आहारात असावे लागतात.
(२) अ, ड, ई व के ही जीवनसत्वे फक्त स्निग्धघटकांमध्येच विरघळत असल्याने त्यांचे पुरेसे शोषण होण्याइतपत स्निग्धघटक आहारात असावे लागतात.
(३) जेवणाला चव येऊन ते खाण्यालायक होण्याएवढी स्निग्धघटके आहारात असावी लागतात.
(४) हे सर्व सांभाळत असतानाच त्यांचा अतिरेक होऊ नये म्हणूनही काळजी घ्यावी लागेल.

शरीराच्या एकूण ऊर्जेच्या गरजेच्या ३ ते ६ टक्के गरज ही अत्यावश्यक स्निग्धाम्लांमुळे पुरी व्हायला हवी. अर्थात ही गरज वय व शारिरीक स्थितीनुसार बदलू शकते. उदाहरणार्थ वाढत्या वयाची मुले, गरोदर स्त्रिया व बाळांना पाजणा-या माता यांची स्निग्धाम्लांची गरज जास्त असते. यासाठी आहारातून साधारण १५ ते २५ ग्रॅम दृष्य स्वरुपातील ( तेले, तूप, लोणी इत्यादी) स्निग्धघटक मिळावे लागतात.
आहारातील अदृष्य स्निग्धघटकांपासून साधारण ६ टक्के ऊर्जा मिळते. शाकाहारी आहारातूनही साधारण १५ग्रॅम अदृष्यस्निग्धघटक मिळतात. यापैकी निम्मी अत्यावश्यक असतात.

साधारण सर्व वयाच्या व सर्व शारिरीक अवस्थेतील लोकांना १५ -२० ग्रॅम दृष्य व १५ -२५ ग्रॅम अदृष्य स्निग्धघटक मिळून पुरेसे होतील.

कोणत्याही परिस्थितीमध्ये स्निग्धघटकांचे आहारातील रोजचे प्रमाण लागणा-या एकंदर ऊर्जेच्या ३० टक्क्यापेक्षा जास्त असू नये. याचाच अर्थ जर २५०० उष्मांक म्हणजेच कॅलरी ही रोजची ऊर्जेची गरज असेल तर त्याच्या ३० टक्के म्हणजेच जास्तीत जास्त ७५० उष्मांक आहारातील दृष्य व अदृष्य स्निग्धघटकापासून मिळावेत. बाकीचे ७० टक्के उष्मांक हे प्रथिने व कार्बोदकापासून मिळावेत.
एक ग्रॅम स्निग्धघटकांपासून ९ उष्मांक मिळतात. म्हणजेच रोज २५०० उष्मांक लागणा-या व्यक्तीच्या आहारात ८० ग्रॅमपेक्षा जास्त स्निग्धघटका असू नयेत.
दृष्य स्वरुपातील स्निग्धघटक घेतले नाहीत तरी अदृष्य स्निग्धघटकांपासून दोन तृतियांश अत्यावश्यक स्निग्धाम्ले मिळतात त्यामुळे स्निग्धघटकांची कमतरता होत नाही.

Please Sign My Guestbook