Carbohydrates3: Metabolism
कार्बोदकांचे पचन व शोषण:
( Digestion & Absorption)

मात्र पिष्टमय तत्वे ही संयुक्त म्हणजेच दोनापेक्षा जास्त अणूंची बनलेली असतात. त्यामुळे शोषणाआधी त्यांचे विघटण व्हावे लागते.
आहारातील संयुक्त कार्बोदकांचे प्रथम तोंडातील लाळेमुळे काही प्रमाणात पचन होते.
त्यानंतर पुढील पचन हे लहान आतड्याच्या सुरवातीच्या भागामध्ये होते. लहान आतड्याच्या ड्युओडेनम या भागात स्वादुपिंडाकडून येणा-या स्वादुपिंड रसात ’अमायलेज" नावाचे विद्राव ( Enzyme) असते. त्यामुळे संयुक्त कार्बोदकांचे प्रथम द्वीअणू शर्करा माल्टोज यामध्ये रुपांतर होते.
माल्टोज ही साखर ग्लुकोजच्या दोन अणूंनी बनलेली असते. परंतु द्वीअणू शर्कराही आहे तशा रक्तात शोषल्या जात नाहीत. पुन्हा त्यांचे एकाणू शर्करे मध्ये रुपांतर व्हावे लागते.
हे विघटनही लहान आतड्यातच होते.

रोज आपण चहा / कॉफी/दूधात घालून घेतलेली ’सुक्रोज’ ही साखरही द्वीअणू असते. त्याचेही लहान आतड्यात ग्लुकोज व फ्रुक्टोज या एकाणू शर्करांमध्ये विभाजन व्हावे लागते. यासाठी ’सुक्रेज’ हे विद्रावक लागते ते लहान आतड्याच्या आतील आवरणाच्या पेशींच्या आवरणांवर असते.
दुधातील नैसर्गिक शर्करा असते ’लॅक्टोज’. ही शर्कराही ग्लुकोज व गॅलॅक्टोज या द्वीअणूंपासून बनलेली असते. त्याचेही विभाजन व्हावे लागते. त्यासाठी लहान आतड्याच्या आवरणावर ’लॅक्टेज’ हे विद्रावक असते.
कार्बोदके संयुक्त असोत की द्वीअणू त्यांचे एकाअणू शर्करेमध्ये विभाजन झाले की या एकाणू शर्करा रक्तामध्ये त्वरीत शोषल्या जातात.
कार्बोदके : चयापचय ( Metabolism)
रक्तात शोषल्या गेलेल्या या शर्करा पचन संस्था व यकृत यांना जोडणा-या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामार्फत मग यकृताकडे पोहोचविल्या जातात. शरीराला त्वरीत ऊर्जा मिळण्यासाठी ग्लुकोज हीच शर्करा लागते. त्यामुळे फ्रुक्टोज व गॅलॅक्टोज या एकाणू शर्करांचेही ग्लुकोजमध्ये रुपांतर व्हावे लागते. ते रुपांतर यकृतामध्ये केले जाते.

सर्वात महत्वाचा अवयव आहे मेंदू. मेंदूचे सर्व कार्य या ग्लुकोजवरच चालते. हे सर्व कार्य होण्यासाठी रक्तात या ग्लुकोजची एक नियमित पातळी असावी लागते.
दूध न पचणे : (Lactose Intolerance) :
कधी कधी काही लोकांना दूध प्यायल्यानंतर पोट फुगते, पोटात गॅसेस होतात, कळा येतात व कधी कधी जुलाबही होतात. असे वारंवार झाले म्हणजे ही मंडळी दूध प्यायला घाबरतत किंवा दूध एकदम वर्ज्य करतात. दूध वर्ज्य केल्यावर पोटाचा हा त्रास होत नाही.
असे का होते?

दुधातील लॅक्टोज या नैसर्गिक साखरेच्या पचना साठी ’लॅक्टेज’ हे विद्रावक लागते व ते लहान आतड्याच्या आतील आवरणाच्या पेशींच्या आवरणावर ( Brush border) असते हे आपण पाहिलेच आहे. काही मंडळींमध्ये हे ’लॅक्टेज’ विद्रावक एक तर मुळातच नसते किंवा कमी असते. ’लॅक्टेज’ च्या कमतरतेचे प्रमाण हे आफ्रिकन अमेरिकन, बान्टूलोक व आशियाई या लोकांमध्ये जास्त ( ८० ते ९० टक्के ) असते.
’लॅक्टेज’ ची ही कमतरता अनुवांशिक किंवा परंपरागत असू शकते. याचबरोबर लहान आतड्यांच्या वेगवेगळ्या आजारांमुळे ही कमतरता होऊ शकते. लहान आतड्याच्या आतील आवरणाला दुखापत, सूज, बॅक्टेरिया/ व्हायरस किंवा इतर जंतूंचा संसर्ग झाला तर हे ’लॅक्टेज’ कमी प्रमाणात तयार होते.
ब-याच भारतीय लोकांमध्ये ’लॅक्टेज’ या विद्रावकाची मुळातच कमी असते. काही जणांमध्ये लहान वयामध्ये ’लॅक्टेज’ योग्य प्रमाणात निर्माण झाले तरी साधारण मुले वयात येण्याच्या सुमारास ’लॅक्टेज’ निर्मितीचे प्रमाण कमी होत जाते.
’लॅक्टेज’ च्या कमतरतेमुळे लॅक्टोज या दुधातील नैसर्गिक साखरेचे पचन/विभाजन होत नाही. परिणामी ही लॅक्टोज साखर रक्तात शोषली न जाता आतड्यात तशीच राहते. आतड्यात साठलेली ही साखर मग रक्तातील पाणी आतड्यात ओढून घेते. आतड्यात नैसर्गिकरित्या असलेल्या सूक्ष्म जंतूंमुळे मग ही साठलेली साखर आंबविली जाते. या क्रियेमध्ये लॅक्टिक आम्ल ( Lactic Acid) व काही स्निग्धाम्ले तयार होतात. या सर्वांमुळे मग पचनक्रिया बिघडते व वर वर्णन केलेली लक्षणे चालू होतात.
अर्थात वरील लक्षणे ही सर्वसाधारण असून ती इतरही काही आजारांमध्ये दिसतात. अशावेळी प्रथम दूध वर्ज्य करून पहावे. दूध वर्ज्य केल्यावर जर खरोखरच फरक पडला तरच ही लक्षणे लॅक्टेजच्या कमतरतेची आहेत असे मानण्यास वाव आहे.
ज्यांच्यामध्ये खरोखरच लॅक्टेजची कमतरता आहे त्यांनी दुधाचे दही करून खावे म्हणजे लॅक्टोज साखरेच्या पचनाचा प्रश्न येत नाही. कारण मुळात दुधाचे दही बनते ते त्यात वाढणा-या लॅक्टोबॅसिलस( Lactobasillus) या सूक्ष्म जंतूंमुळे. हे लॅक्टोबॅसिलस ’लॅक्टेज’ निर्माण करतात. परिणामी दह्यामधून भरपूर प्रमाणात लॅक्टेज मिळते व दुधातील लॅक्टोज साखरेचे पचन व्यवस्थित होते. म्हणजेच दूध न पचण्याच्या त्रासातून मुक्तता व दुधातील सर्व पौष्टिक तत्वांचा शरीराला फायदा..
