Sunday 10 February, 2008

कार्बोदके ५ : अतिरेक

आहारातील साखर
शंभर वर्षापुर्वी माणूस साधारण वर्षाला दोन किलो साखर खात असे. आता त्याचे प्रमाण पन्नास किलो झालेले आहे. तुमच्या घरात माणसी किती साखर वापरली जाते हे एकदा पहा.कदाचित तुम्ही एकटेच आठवड्याला अर्धाकिलो साखर खात असाल. तर मात्र हे प्रमाण खूपच जास्त आहे.

आणि हे कमी म्हणून की काय तुम्ही केक, बिस्किटे, गोड पक्वान्न, चॉकलेट व पळांचा रस, इतर पेये यामधूनही तेवढीच साखर घेत असता. हे प्रमाण तर अतीच झाले.!
पण निदान वरील पदार्थ खाताना तुम्ही साखर खात आहात हे समजते तरी पण तुम्ही जेव्हा टोमॅटो केचप, भाजलेली कडधान्ये, प्रक्रिया केलेले अन्न खाता तेव्हाही साखर तुमच्या शरीरात जातच असते फक्त तेव्हा तुम्हाला ती दिसत अथवा जाणवत नाही. खरे वाटत नाही ना.. पण घरी आणलेल्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थाच्या पाकिटावरील माहीती एकदा वाचून पहा..त्यात तुम्हाला नक्कीच साखर आढळून येईल.

कार्बोदके कोणत्याही रुपात ( तंतू सोडून) खाल्ली तरीही त्यांचे रुपांतर ग्लुकोज साखरेत होते हे तर आता तुम्हाला कळलेच आहे.
तयार साखर खाण्यापेक्षा जर तुम्ही पिष्टमय तत्व म्हणजेच संयुक्त कार्बोदके व तंतूमय कार्बोदके आहारातून घेतली तर ती तुमच्या शरीराला जास्त आरोग्यदायी आहेत. एकतर नुसती साखर खाण्यापेक्षा धान्ये, कडधान्ये, तांदूळ, बटाटे इत्यादीमुळे तुमची भूक शमते. तसेच त्यातील संयुक्त कार्बोदकांचे पचन हळूहळू झाल्याने तुम्हास वारंवार खावे लागत नाही. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे त्यापासून मिळणारी ऊर्जा, शक्ती तुम्हास जास्त वेळ पुरते.

साखरेचा अतिरेक
साखर शरीरात लगेच शोषली जाऊन सर्व पेशी व अवयवांपर्यंत लगेच पोहोचल्याने ती शरीराला त्वरीत ऊर्जा व शक्ती देते म्हणून खूप खेळल्यावर अथवा खूप व्यायाम झाल्यावर खूप ऊर्जा मिळावी म्हणून तुम्ही फक्त सतत साखरच खाल्ली तर ते बरोबर नाही. कारण त्यापासून शरीराला काही पोषक तत्वे मिळत नाहीत.
इतर आहार न घेता नुसतीच साखर खाल्ली तर भूकेची जाणीव सतत राहते तसेच तुम्हास दुसरी पोषकतत्वे व तंतूमय तत्व मिळत नाहीत. मात्र शरीरात जास्त साखर जाते. जास्त प्रमाणात मिळालेली ही साखर अर्थातच तुमचे शरीर साठवून ठेवते. हा साठा केला जातो चरबीच्या स्वरुपात. म्हणजेच जितकी जास्त साखर तुम्ही खाल तितकी जास्त चरबी तुमच्या शरीरात साठत जाईल.
म्हणून जास्त गोड खाण्याची सवय सुटली नाही तर या किलो किलो साखरेची चरबी बनून तुमचे वजन वाढत जाऊन तुमची लठ्ठपणाकडे वाटचाल चालू होईल. मराठीत आपण लठ्ठ माणसाला गुळाचा गणपती म्हणतो. गूळ हाही साखरच असल्याने ही उक्ती किती सार्थ आहे ...!!
वजन खूप वाढलेले, लठ्ठ गोलगरगरीत’ गुळाचा गणपती’ असे स्वत:च्याच शरीराचे चित्र तुम्ही क्षणभर डोळ्यासमोर आणा. तुमचे तुम्हालाच हसू येईल..! आणि दुर्दैवाने प्रत्यक्षात तुम्ही तसे झालात तर मग इतर जण तुम्हाला हसतीलच हसतील..!
इतरांचे हसणे सोडाच पण प्रमाणाबाहेर लठ्ठपणामुळे अनारोग्याचे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतील ते वेगळेच..!!

आहारात नेहमी गोडपेये, पदार्थ व साखरेचे जास्त प्रमाण असेल तर आणखी एक त्रास तुम्हास होईल. या गोडपदार्थातील गोडकण दातांच्या फटीत अडकून राहतात. आता हे साखरेचे कणच जंतूंचे अन्न आहे. जितके जास्त गोड खाल तितक्या जास्त प्रमाणात जंतूंची वाढ भराभर होईल. या जंतूंमुळे तोंडात घाण व आम्ल तयार होते. आम्लामुले दातांना कीड लागून खड्डे व पोकळ्या तयार होतात. त्यातून दुर्गंधी सुटते. या दुर्गंधी मुळे तुमचे जवळचे लोकही तुम्हाला टाळतील हे वेगळेच..!!

Please Sign My Guestbook