Sunday 20 April, 2008

स्निग्धघटक ५ : आहारातील स्निग्धघटके:

आहारातून दोनप्रकारे स्निग्धघटक शरीरात जातात.
(१) दृष्यरुपात:
स्वयंपाकाचे माध्यम म्हणून आपण नेहमी जी तेले वापरतो ती सर्व शरीरात जाणा-या स्निग्धघटकांची दृष्य रुपे आहेत. यामध्ये संपृक्त तसेच असंपृक्त स्निग्धघटके असून ती पुढील प्रमाणे असतात,
(अ) प्राणीजन्य स्निग्धघटके : जसे तूप, लोणी इत्यादी घनरूप स्निग्धघटके. ही स्निग्धघटके घनरूप आहेत याचाच अर्थ ती सर्व संपृक्त स्निग्धघटके असून यामध्ये नैसर्गिकरित्या अ व ड ही जीवनसत्वे असतात.
(ब) वनस्पती जन्य स्निग्धघटके: जसे शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, तीळ , खोबरे, मका, पाम इत्यादी तेले. ही स्निग्धघटके द्रवरूप असतात म्हणजेच ती असंपृक्त स्निग्धघटके आहेत. यामध्ये नैसर्गिकरित्या जीवनसत्वे नसतात. अर्थात हल्ली बाजारात मिळणारी तेले शुध्द केलेली असून त्यावेळी त्यात काही प्रमाणात जीवनसत्वे मिसळलेली असतात हा भाग वेगळा.
( २) अदृष्यरुपात:
आहारातील इतर अन्नघटकांत ब-याच प्रमाणात स्निग्धघटके असतात. उदाहरणार्थ : धान्ये, डाळी, सोयाबीन, दूध, अंडी, मांस, खोबरे, शेंगदाणे, तीळ व इतर तेलबिया. आहारात ही स्निग्धघटके दृष्यरुपात दिसत नसली तर त्यांचे प्रमाणही बरेच असते. धान्ये व डाळी यांचा समावेश असलेल्या व वरून बिलकूल तेल न घातलेल्या कोणत्याही आहारातून रोजच्या स्निग्धाम्लांच्या गरजेच्या ५० टक्के गरज पूर्ण होते.

शरीरात तयार न होणारी पण अत्यंत आवश्यक असणारी अत्यावश्यक स्निग्धाम्ले आहारातील अतिअसंपृक्त ( polyunsaturated fat PUFA) वनस्पती तेलांमधून मिळू शकतात. उदाहरणार्थ जवस, करडई, सूर्यफूल, मका यांचे तेल. या अतिसंपृक्त तेलांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. परिणामी रक्तवाहिण्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे होणारा हृदयविकाराचा धोका कमी होतो. असंपृक्त वनस्पती तेलांमध्ये असणारे लिनोलीक आम्ल ( Linoleic acid 18:2) हृदयविकार टाळण्यासाठी उपयुक्त आहे.
शास्त्रज्ञांना असेही आढळून आले आहे की मासे व माशांपासून मिळणा-या तेलात असणारे लिनोलेनिक ( Linolenic acid 18:3) हे स्निग्धाम्ल हृदयविकार टाळण्यासाठी तितकेच उपयुक्त आहे. किंबहूना या दोन अत्यावश्यक स्निग्धाम्लांचे आहारातील प्रमाण एकमेकांशी योग्य प्रमाणात ( ratio) असेल तर हृदयाच्या आरोग्यासाठी ते उत्तम आहे.

Please Sign My Guestbook