Thursday, 31 May, 2007

अपायकारक शीतपेये

बहुसंख्य
लोकांना, यात लहानमुले, तरूण प्रौढ व्यक्तीसुध्दा समाविष्ट आहेत, बाटलीबंद शीतपेये पिण्याचे वेड असते. अगदी दोन ते तीन महिन्याच्या मुलांनाही ही पेये पाजताना प्रस्तुत लेखिकेच्या पाहण्यात आलेले आहे. बारा महिने लोक ही पेये पीत असतात. जेवतानासुध्दा पाण्याऐवजी हीच पेये पिताना लोक दिसतात. काही लोक उन्हाळ्यामध्ये ही शीतपेये घेतात.


या सर्व पेयांमध्ये साधारण ८० -९० टक्के पाणी असते त्यामुळे या पेयांमुळे तुमची पाण्याची गरज काही प्रमाणात भागू शकते. पण कोणतेही पोषकतत्व त्यात नसते. त्यामुळे त्यापासून शरीराला पोषण काहीच मिळत नाही. त्यामुळे अशी शीतपेये केव्हातरी घेणे वेगळे पण बाहेर किंवा घरातही सतत तीच पेये पीत राहणे हे आरोग्याला अतिशय अपायकारक आहे.

हल्ली कोकाकोला, थम्स अप, पेप्सी आणि कायकाय नावे असलेली शीतपेये पिण्याचे प्रमाण खूपच वाढलेले दिसते. हा बराचसा जाहिरातींचाच परिणाम आहे. उन्हाळ्यामध्ये तर टीव्ही वर या पेयांच्या एकमेकांविरुध्द जाहिरातींचे युध्दच पहायला मिळते.
पण बाजारात मिळणारी ही शीतपेये आरोग्याला सर्वात जास्त अपायकारक आहेत . या पेयांमध्ये स्वादासाठी कृत्रीम पदार्थ घातलेले असतात. तसेच ती टिकावी म्हणून रासायनिक पदार्थही घातलेले असतात. आणि काही काही पेयांमध्ये तर कीटक नाशकांचे घातक प्रमाणही आढळून आलेले आहे.
या कृत्रीम पेयांमुळे अलर्जी होऊ शकते. ही पेये महाग तर असतातच पण त्यातून उष्मांकही भरपूर मिळतात. त्यामुळे सतत अशी पेये पिण्याने शरीरात गरजेपेक्षा जास्त उष्मांक जातात. परिणामी वजन वाढू शकते. ही पेये सतत पिण्यामुळे हाडांवर परिणाम होऊन हाडे ठिसूळ बनतात.

शीतपेये सीलबंद बाटलीतूनच मिळतात म्हणून ती घेणे चांगली असा युक्तीवाद ते घेणारे करतात पण सध्या प्रत्येक गोष्ट नकली मिळते. तशीच शीतपेयेही नकली बनविली जातात. आणि बाटलीबंद असली तर ती कोणत्या झोपडपट्टीत, कोणत्या पाण्यापासून बनविली असतील ते फक्त ते बनविणारेच जाणोत. त्यामुळे केवळ बाटलीबंद आहेत म्हणून ही पेये घेणेच चांगले!
तेव्हा ही अशी पेये पिण्याचे फायदे तर काहीच नाहीत पण तोटे मात्र भरपूर आहेत. त्यामुळे जाहिरातींना भूलून ही शीतपेये पिणे म्हणजे हळूहळू विष घेण्यासारखेच आहे.
मग अमीरखान कितीही सांगू देत की, " थंडा मतलब कोकाकोला" किंवा सलमान खान कितीही विचारू दे " Have you grown up to Thump Up yet?" किंवा शाहरूख, सचिन किंवा अमिताभ बच्चन कितीही म्हणूदे " ये दिल मांगे मोअर!".
दिल कितीही " मांगे मोअर" असलं तरी ही पेये आहेत " डेंजरस मोअर" हे तुम्ही लक्षात घ्या!!

Please Sign My Guestbook