शरीरातील सर्व अवयवांचे, स्नायुंचे, पेशींचे कार्य होण्यासाठी ऊर्जा लागते. शरीराला लागणा-या एकंदर ऊर्जेची अर्ध्यापेक्षा जास्त गरज कार्बोदकांमुळे भागविली जाते. काही अवयव तर फक्त कार्बोदकांपासून मिळणा-या ऊर्जेवरच अवलंवून असतात. उदाहरणार्थ मेंदूचे सर्व कार्य सर्वस्वी साखरेपासून मिळणा-या ऊर्जेवरच चालते.
शरीराची सर्व महत्वाची कार्ये होण्यासाठी ऊर्जेची गरज असते.
उदाहरणार्थ
(१) ऊर्जा : शरीरातील सर्व पेशी, स्नायु तसेच मेंदू व नसा यांना साखरेपासूनच ऊर्जा मिळते.
(२) निर्माण व झीज: पेशी तयार होण्यासाठी व त्यांची झीज भरून येण्यासाठी कार्बोदकांचा उपयोग होतो.
(३) ग्लायकोजन: शरीराची गरज भागवून उरलेली जास्तीची कार्बोदके यकृताकडे पाठविली जातात. तेथे ती ग्लायकोजन मध्ये रुपांतरीत होऊन पुढील काळासाठी साठविली जातात.
तुम्ही एखादे दिवशी आहार घेतला नाहीत, उपास केलात किंवा काही लोक उपोषणाला बसतात तेव्हा हेच ग्लायकोजन पुन्हा ग्लुकोजमध्ये रुपांतरित होऊन रक्तामध्ये येते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखले जाते व तुम्हाला शक्तीचा पुरवठा केला जातो. अशाप्रकारे शरीराने साठविलेले ग्लायकोज उपास काळात तुमच्या उपयोगी पडते. उपोषणकर्त्याचा शरीरात जितके जास्त ग्लायकोजन साठले असेल तेवढा जास्त वेळ काही त्रास न होता ते उपोषण करु शकतात.
तुमच्या स्नायुंना ग्लुकोजची अत्यंत गरज असते. तातडीच्या वेळी उपयोगी पडावे म्हणून थोडे ग्लाय्कोजन स्नायुंमध्येही साठविले जाते.
(४) तंतूमय कार्बोदके अथवा सेल्युलोज : इतर कार्बोद्कांपासून याचे कार्य वेगळे आहे. त्यात शरीरास पोषकतत्वे नसतात. किंबहूना शरीर या तंतूंचे पचनही करू शकत नाही. आणि म्हणूनच या तंतूंचा मुख्य़ उपयोग शौच बांधनी साठी होतो. आहारात भरपूर पालेभाज्या, सालीसकट खाता येण्यासारखी फळे असतील तर तुम्हाला शौचास नेहमी साफ होईल व पुढील आयुष्यात आतड्याचे आजार होणार नाहीत.
