Friday, 15 June, 2007

झटपट चटपट खाद्य संस्कृती :

धावपळीच्या जीवनात सकाळी कामावर जाताना घाईमुळे घरी जेवण बनविणे काही लोकांना शक्य होत नाही. घरातून बाहेर पडल्यावर आपली नजर कामाच्या ठिकाणीच अथवा जाण्याच्या मार्गावरच एखादे चांगले उपहारगृह आहे का याचा सतत शोध घेत असते. किंबहूना आजच्या धावपळीच्या युगात हे सर्वमान्य व रोजचे झाले आहे की कार्यालयाच्या आजूबाजूला चांगले उपहार गृह नसेल तर आपली खरच खूप गैरसोय होते.

पण या खाद्यसंस्कृतीचे जनक कोण याचा कधी विचार केलाय?

पटकन खाता येतील किंवा बरोबर नेता येतील असे चटपटीत पदार्थ कामावर जाण्याच्या मार्गावर उपलब्ध झाले तर लोक त्याचे स्वागतच करतील या व्यापारी विचारातून खाण्याचे पदार्थ आधीच बनवून, ते व्यवस्थित कागदात गुंडाळून नोकरीवर जाण्याच्या वाटेवरच विकण्याची सर्वप्रथम सुरुवात अमेरिकेतील मॅकडोनाल्ड नावाच्या बंधूनी केली.

झटपट बनवून पटकन खाता येतील अशा चटपटीत पदार्थांचे दुकान ( दुकान कसले टपरीच ती) त्यांनी प्रथम लोकांना नोकरीवर घेऊन जाणा-या बसच्या थांब्यावर सुरू केले. कामावर जाणारेयेणारे लोक या बसथांब्यावर उपलब्ध असलेले पदार्थ खाऊ लागले. काहीना ते नोकरीच्या ठिकाणी नेण्यासाठी व्यवस्थित कागदात गुंडाळून दिले जात. लोकांची सोय झाली आणि मॅकडोनाल्ड बंधूंच्या या व्यवसायाला खूप यश मिळाले. यासाठी त्यांना एक व्यवस्थापक नेमावा लागला. पुढे याच व्यवस्थापकाला आपला हा व्यवसाय विकून त्यांनी आणखी नफा मिळविला. मात्र विकताना ’मॅकडोनाल्ड’ नाव कायम ठेवण्यची अट मात्र घातली.
आज याच मॅकडोनाल्ड उपहारगृहांची साखळीच सर्व जगभर पसरली आहे. एखादे मॅकडोनाल्ड उपहारगृह तर तुमच्या गल्लीत तुमच्या घराजवळ असण्याची शक्यता आहे.


मॅकडोनाल्ड बंधूंनंतर व्यावासायिक दृष्टीकोनातून या व अशा प्रकारची झटपट बनवून पटकन खाता येणारे चटपटीत पदार्थ विकणारी उपहारगृहे / धाबे / टप-या / गाड्या रस्तोरस्ती दिसू लागल्या. तेव्हापासून धावपळीच्या जीवनात सकाळी घरातून बाहेर पडल्यावर कुठेही, केव्हाही आणि स्वस्तात मिळू शकणा-या झटपट चटपट खाद्यपदार्थांचे एक नवे युगच सुरू झाले. अशा खाद्यप्रकारांमुळे लोकांची सोय झाली त्यामुळे अशा खाण्याकडे लोकांचा कल वाढू लागला . घरी बनविलेला पोळीभाजीचा डबा बरोबर घेऊन जाण्यापेक्षा तेथेच उपहारगृहामध्ये अथवा रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ खाण्यातच लोकांना सोय व विविध चवींचा आस्वाद यांचे आकर्षण वाटू लागले. ही झटपट खाद्यसंस्कृती आता जगभर चांगलीच फोफावून आज जवळजवळ सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनून राहिली आहे.

धावपळीच्या जीवनात सोय होते हा मोठा फायदा असला तरी या झटपट खाद्यसंस्कृतीचे बरेच तोटेही आहेत.

घरी बनविलेले अन्न हे खूप काळजीपूर्वक व अत्यंत स्वच्छ वातावरणात बनविलेले असतात. त्यात वापरलेले घटकही अत्यंत काळजीपूर्वक निवडून घेतलेले असतात म्हणून शुध्द असतात. त्यामुळे घरी बनविलेले अन्न खाणे हे आरोग्याचा दृष्टीने अतिशय योग्य असते. याउलट उपहारगृहात बनविलेले पदार्थ हे व्यावसायिक दृष्टीने बनविलेले असल्याने स्वस्त घटक वापरून बनविलेले असतात. तसेच ब-याच वेळा ते अस्वच्छ वातावरणात बनविले असण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ते खाण्याने आजार होऊ शकतात.

तळलेले पदार्थ बनविताना देखिल तेच ते वापरलेले तेल पुन्हा वापरले जाते. असे करणे आरोग्यास अतिशय घातक आहे. जेथे उपहारगृहामध्ये बनलेल्या अन्नाबद्दल ही अवस्था आहे तेथे धाब्यावर / गाडीवर /रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ आरोग्यास किती घातक असतात याची कल्पनाच करवत नाही.
रस्त्यावर तळलेले पदार्थ विकणारे कधीकधी मारुतीला घातलेले तेल तळण्य़ासाठी वापरतात असे आढळून आले आहे. त्यात इतर घाणीबरोबर शेंदूरही मिसळलेला असतो. त्यापासून घशाला त्रास होऊ शकतो. रस्त्यावर विकले जाणारे पदार्थ उघड्यावरच बनविले / मांडले जातात.
तसे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत हे सर्वांनाच माहीत असते पण तरी समोर आकर्षक रितीने मांडलेला पदार्थ पाहून तोंडाला पाणी हे सुटतेच! खायचा मोह हा होतोच!

पण या मोहापायी उलटी, जुलाब, हगवण, विषमज्वर, कावीळ या सारखे आजार होतात हे लक्षात ठेवायला हवे.
कमी वेळ, घाई गडबड, जीवघेणी स्पर्धा यातून आहाराकडे होणारे दुर्लक्ष , त्यातून निर्माण झालेली ही झटपट खाद्यपदार्थांची गरज व खाण्य़ाची वृत्ती, अशा पदार्थांची रेलचेल, आंतरराष्ट्रीय पदार्थ अगदी जवळच्याच उपहार गृहामध्ये मिळण्याची सोय, ते खाण्य़ाची निर्माण झालेली आवड, त्यामुळे बहुसंख्य वेळा घरच्या खाण्याकडे दुर्लक्ष, वारंवार तळलेले पदार्थ खाण्यामुळे लठ्ठपणा, त्यातून मधूमेह ही परिस्थिती आहारशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत निराजाजनक आहे.

आशेचा किरण ?
पण हल्ली या परिस्थितीतही एक आशेचा किरण दिसू लागला आहे. काही लोक आपण काय खातो, किती खातो व केव्हा खातो याचा गांभिर्याने विचार करु लागले आहेत. अन्नपदार्थ तयार करताना व टिकविण्यासाठी त्यामध्ये मिसळावी लागलेली रासायनिक द्रव्ये व या रासायनिक प्रक्रियांमुळे अन्नपदार्थातील पोषक घटकांची होणारी घट या सा-यांची जाणीव निदान काही लोकांना तरी होऊ लागली आहे. यातूनच आरोग्यदायी अन्न या चळवळीचा उगम झाला आहे.
आदिमानव निसर्गातून जसे मिळेल तसे नैसर्गिक अन्न खात असत व त्यांना दीर्घायुष्य लाभत असे. हे लक्षात आल्याने आज रासायनिक प्रक्रिया न केलेले अन्नपदार्थ खाण्याकडे काही लोकांचा का होईना कल वाढू लागला आहे. तसेच लोक ताजी फळे, हिरवा भाजीपाला व कोंड्यासकट धान्याचे पीठ यासारख्या तंतूमय पदार्थांचा वापर जास्त करू लागले आहेत. त्यामुळे आतड्याचे कित्येक रोग टाळता येऊ शकतात. काही लोक लोणी, अंडी , चरबीयुक्त मांस व इतर तेलकट पदार्थ आपल्या आहारातून वर्ज्य करीत आहेत.

आजच्या परिस्थितीत घराबाहेर खाण्याशिवाय पर्याय नसतानाच पाककलाही लोकांना आवडू लागली आहे. काही लोकांचा तो छंद तर काही लोकांचा तो व्यवसाय बनला आहे. त्याच बरोबर आहारशास्त्रही खूप प्रगत झाले आहे.
Please Sign My Guestbook