Monday 12 November 2007

प्रथिने ६ : प्रथिनांची कमतरता:
आतापर्यंत आपण प्रथिने म्हणजे काय, शरीरात त्यांचा चयापचय कसा होतो, शरीरात त्यांची कार्ये काय प्रथिनांचा स्रोत व प्रकार, प्रथिनसमृद्ध अन्नप्रकार , तसेच प्रथिनांची शारिरीक गरज प्रत्येक अन्नप्रकारामधून मिळणा-या प्रथिनांचे प्रमाण याबद्दल माहीती घेतली.
यावरून शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होण्यासाठी आहारात कोणत्या अन्नप्रकारांचा समावेश करायला हवा हे ब-याच अंशी कळू शकते.
जर काही कारणाने शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण झाली तर शरीरावर, शारिरीक कार्यांवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे जाणून घेऊया. म्हणजेच प्रथिनांच्या कमतरतेमुळे काय आजार होऊ शकतात हे जाणून घेऊया.
लहान मुले :
प्रथिनांची कमतरता जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येते.
लहान मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांना ’क्वाशिओरकोर / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) नावाचा आजार होतो.
’क्वाशिओरकोर / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) हा शव्द ’घाना’ या आफ्रिकी देशात बोलल्या जाणा-या ’गा’या भाषेतील आहे. या भाषेत ’क्वाशि’ म्हणजे एक किंवा पहिला व ’ओरकोर’ म्हणजे दुसरा. याचा साधारण अर्थ आहे ’दुस-यासाठी पहिल्याला बाजुला ढकलणे’ .
यावरून या आजाराचे जे कारण आहे ते स्पष्ट होते. एखाद्या स्त्रीला एकापाठोपाठ लगेच दुसरे मूल झाले तर दुस-या मुलाला अंगावर पाजण्यासाठी पहिल्या मुलाला अंगावर पाजायचे तोडले जाते. तोडलेले ते पहिले मूल तेही अजून लहानच असल्याने जेऊ शकत नाही. मग त्याला तांदळाचे किंवा रताळी इत्यादी तत्सम कंदमुळांचे उकडलेले पाणी प्यायला दिले जाते. त्यामुळे त्याची उष्मांकाची ( कॅलरीज) गरज पूर्ण होते पण त्यातून प्रथिने मात्र मिळत नाहीत.मग प्रथिमांच्या कमतरतेमुळे त्या मुलाची वाढ खुंटते. मूल मंदबुध्दी होते. रक्तातील अल्बुमिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित रहात नाही . परिणामी सर्वांगावर सूज येते. पोटातही पाणी साठून पोटाचा घेर खूप वाढतो. लिव्हरला सूज येते. कातडीवर काळे डाग पडतात. खवले पडतात. केसही प्रथिनांपासून बनलेले असल्याने ते एकदम खरबरीत, लालसर रंगाचे बनतात. सहज हात लागला तरीही असे केस तुटतात वा गळून पडतात.
शरीराची रोगप्रतिकार शक्ती ही प्रथिनांमुळे असते त्यामुळे प्रथिनांची कमतरता झाली तर शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुध्दा कमी होते. परिणामी अशा मुलांना निरनिराळे जंतूसंसर्ग होऊ शकतात. हे जंतूसंसर्ग कधी कधी प्रतिजिविके ( antibiotics) सारख्या औषधालाही दाद देत नाहीत.
शरीरातील अंतरग्रंथी जसे थायरॉईड , अड्रीनल , पॅराथायरॉईड, अंडकोश व बीजकोश या सर्व ग्रंथींमधून स्रवणारे स्राव ( हार्मोन ) सुध्दा प्रथिनेच असल्याने प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांचे कार्य सुरळीत चालत नाही.
हा आजार जास्तकरून आफ्रिकी, आशियाई व दक्षिण अमेरिकी देशांत दिसून येतो.


प्रौढ व्यक्ती मधील कमतरता:
लहान मुलांव्यतिरिक्त ज्या प्रौढ व्यक्ती दीर्घ काळ आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत अशांमध्ये सुद्धा प्रथिनांची कमतरता दिसून येते. जास्तकरून ज्या व्यक्ती वा जे रुग्ण तोंडाने अन्न घेऊ शकत नाहीत व ज्यांना शीरेतून मुख्यत: साखर (i.v. glucose) दिली जाते अशा प्रौढ व्यक्तींमध्ये सुध्दा हा आजार दिसून येतो.
या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीच्या आहारात फक्त नुसताच भात, बटाटे, रताळी, साखर इत्यादी पिष्टमय ( carbohydrates) असल्यामुळे त्यांना पुरेशे उष्मांक मिळतात पण प्रथिनांची कमतरता असेल तर अशा व्यक्तीलाही हा ’क्वाशिओरकोर’ हा आजार होऊ शकतो.

हा विकार होऊ नये म्हणून बाजारात मिळणा-या महागड्या प्रोटिनेक्स वगैरे प्रोटिन्सच्या पावडरी खाण्यापेक्षा आपल्या पूर्वजानी सांगितलेला ,प्रथिने, कार्बोदके , स्निग्धघटक तसेच जीवनसत्वे व खनिजे यांचे संतुलित व योग्य प्रमाण असलेला चौरस आहार घेणे जास्त चांगले.


Please Sign My Guestbook