Thursday, 20 March 2008

स्निग्धघटक २ : प्रकार

रासायनिक रचने प्रमाणे स्निग्धघटक दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत.

(१) संपृक्त स्निग्धघटक : ( Saturated Fat ) :
यामध्ये प्रत्येक कार्बन अणू दुस-या अणूला एकाच बाजूने जोडलेला असतो व प्रत्येक कार्बन अणूला हायड्रोजनचे जास्तीत जास्त अणू जोडलेले असतात.
संपृक्त तेले ही जास्तकरून प्राणीजन्य असतात. उदाहरणार्थ लोणी, तूप, मांस, गुरांची चरबी. तसेच वनस्पतीजन्य डालडा, खोबरेल व पाम तेले ही सुद्धा संपृक्त तेले आहेत.

या तेलांमध्ये मायरिस्टिक ( Myristic Acid) व पामिस्टिक ( Palmistic Acid) ही स्निग्धाम्ले असतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. पर्यायाने त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

(२) असंपृक्त स्निग्धघटक:Unsaturated fat

यामध्ये स्निग्धाम्लांच्या साखळीत कार्बन अणूमध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी दुहेरी बंधने असतात. जास्तीत जास्त २२ कार्बनचे अणू व सहा ठिकाणी दुहेरी बंधने अशा असंपृक्त स्निग्धघटकांना २२:६ स्निग्धाम्ल असे म्हणतात.
ज्या स्निग्धघटकामध्ये कार्बनची जास्तीत जास्त दुहेरी बंधने तितका तो स्निग्धघटक मऊ व नरम असतो. कार्बनच्या साखळीवर त्याच्या नरम पणा अवलंबून असतो.

ही तेले वनस्पतीजन्य असतात. उदाहरणार्थ शेंगदाणे, बिया, सोयाबिन, मका , सूर्यफुलाचे बी, ऑलिव्ह तीळ इत्यादिपासून काढलेली तेले.

यातही दोन प्रकार आहेत.

(अ) एकेरी असंपृक्त तेले : MonoUnsaturated Fatty Acids ( MUFA):

यात कार्बनचे एकच दुहेरी बंधन असते त्यात ओलेइक ( Oleic acid) हे स्निग्धाम्ल असते. ओलेईक स्निग्धाम्लाच्या आकृतीत कार्बनचे एकच दुहेरी बंधन दिसते आहे.)


(ब) अतिअसंपृक्त तेले : PolyUnsaturated Fatty Acid ( PUFA) :

यामध्ये कार्बनची दोन किंवा दोनापेक्षा जास्त दुहेरी बंधने असलेली स्निग्धाम्ले असतात. यातील मुख्य स्निग्धाम्ल( मेदाम्ल) आहे लिनोलेईक ( Linoleic Acid). या मेदाम्लाची इतर रुपे पण असतात. लिनोलीक ( Linoleic) आणि अरचिडोनीक ( Arachidonic Acid) ही सर्व अतिआवश्यक ( Essential Fatty Acids) स्निग्धाम्ले आहेत.

स्निग्धघटकांचे स्वरूप :

सामान्य तपमानाला ही स्निग्धघटके ज्या स्वरुपात राहतात त्यानुसारही त्यांचे दोन गट आहेत.

(१) द्रवरूप : Liquid Fat

हे स्निग्धघटक नेहमीच्या तपमानात द्रवस्वरूपात राहतात. ती असंपृक्त असून अशी तेले वनस्पतीजन्य व मांसापासून मिळणारी असतात.

(२) घनरुप : Solid Fats

ही स्निग्धघटके नेहमीच्या तपमानात द्रवरूप न राहता घन स्वरूपात अथवा कडक स्वरुपात राहतात. कार्बनच्या दुहेरी साखळीला हायड्रोजन्चे अणू जोडून तेलांपासून कडक वा घन स्वरुपातील स्निग्धघटक बनविता येतो.


असंपृक्त ( Unsaturated ) व अतिअसंपृक्त ( PolyUnsaturated PUFA) स्निग्धघटक हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतात. संपृक्त तेलांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढून हृदयविकाराला निमंत्रण मिळते.

Monday, 10 March 2008

स्निग्धघटक १ : रचना

आहारातील स्निग्धघटक : Dietary Fat

आहारातील तेल, तूप, चरबी हे सर्व स्निग्धघटक आहेत. स्निग्धघटक, चरबी, तेले अथवा फॅट हे सर्व रासायनिक पदार्थांचे गट आहेत. कार्ब ( कार्बन) , हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने हे स्निग्धघटक अथवा चरबी बनते.

आपल्या रोजच्या आहारातील हा एक महत्वाचा घटक असून शरीराला याची विविधप्रकारे गरज भासते. सर्वप्रथम या स्निग्धघटकांपासून भरपूर ऊर्जा मिळते. १ ग्रॅम प्रथिने किंवा कार्बोदकांपासून मिळणा-या ऊर्जेच्या दुप्पटीने १ग्रॅम स्निग्धघटक ऊर्जा देतात.

स्निग्धतेमुळे आपले अन्न खाण्यालायक चवदार होते. पोळीवर अथवा वरणभातावर तूप घातले तर एक वेगळीच चव येते. तेल हे आपले अन्न शिजविण्यासाठी लागणारे माध्यम पण आहे. तेलाची फोडणी नसेल तसे कोणतीही भाजी शिजवायची कशी? भजी /वडे / सामोसे तळायचे कसे?

आहारातील तेलांमुळे आपले पोट लवकर रिकामे होत नाही व खाल्लेल्या अन्नाच्या उदरातील पचनासाठी वेळ मिळतो.

रीराला आवश्यक अशी काही जीवनसत्वे फक्त चरबी / तेलामध्येच विरघळतात त्यामुळे ती रक्तात शोषली जाऊन शरीराला मिळतात.

काही स्निग्धाम्ले ( Fatty Acid) शरीराच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. पण शरीर त्यांची निर्मिती करू शकत नाही. अशा स्निग्धाम्लांना ’अति आवश्यक स्निग्धाम्ले’ ( Essential Fatty Acids) म्हणतात. वनस्पतीजन्य स्निग्धघटकांपासून अशी “अतिआवश्यक स्निग्धाम्ले”मिळतात. ही शरीराच्या वाढीसाठी , पेशींच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. शरीरात ही अति आवश्यक स्निग्धाम्ले जीवनसत्वांचे कार्य करतात.

स्निग्धाघटकांची रचना :

फॅट किंवा स्निग्धघटके बनतात स्निग्धाम्ल ( Fatty Acid) व ग्लिसरॉल ( हे मद्यार्क आहे) या दोन मूलभूत घटकांपासून.
स्निग्धाम्ल: मेदाम्ल : Fatty
Acid :

कार्बन अणूंच्य़ा लांबच लांब साखळीला हायड्रोजनचे अणू जोडले जाऊन स्निग्धाम्ल बनते. तीन स्निग्धाम्लांच्या साखळीला ग्लिसरॉल किंवा ग्लिसरीनचा अणू जोडला जाऊन फॅट किंवा स्निग्धघटक बनतो.

ग्लिसरॉल :: ग्लिसरीन : Glycerol :

ग्लिसरॉल/ ग्लिसरीन हे शर्करा मद्यार्क आहे. हे वासविरहीत द्र्वरूप स्वरुपाचे असून कार्बनचे तीन

अणू व तीन हायड्रोक्सी( OH) घटक एकमेकांना जोडले गेल्यामुळे बनते.
बाजूच्या आकृतीत ग्लिसरॉलची रचना दर्शविली आहे.


ग्लिसरॉलच्या या सांगाड्याला तीन स्निग्धाम्लांच्या साखळ्या जोडल्या जाऊन स्निग्धघटक बनतात


Please Sign My Guestbook